पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 औद्योगीकरणाचा अपरिहार्य परिणाम म्हणून काही प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात, त्यातल्या काही टाळता येण्यासारख्या असतात, काही नसतात. यासाठी स्थानिक पातळीवर बंधने परिणामकारक ठरू शकतील. त्यासाठी बोजड शासकीय इन्स्पेक्टरगिरीची गरज नाही. पृथ्वीवरील काही देशांत औद्योगीकरण जास्त झाले. तिसऱ्या जगातील देशांत औद्योगीकरणाची काही बेटेच उभी राहिली अणि तेथेच पाश्चिमात्य तोंडवळ्याचा प्रदूषणाचा प्रश्न उभा राहिला. शेतीतून तयार होणाऱ्या बचतीतून औद्योगिक भांडवल तयार होणे, त्यातून छोट्या उद्योगधंद्यांपासून मोठ्या कारखान्यापर्यंतची वाढ हे सर्व शेतकऱ्यांच्या हातात राहिले असते, थोडक्यात, भांडवलनिर्मितीची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या शोषणावर आधारलेली नसती तर मुंबईसारखे कारखान्यांचे उकिरडे तयार झाले नसते आणि प्रदूषणाचा प्रश्न आटोक्यात राहिला असता. साम्राज्यवादाने प्रदूषण अधिक फोफावले आणि नेहरूवादाने तिसऱ्या जगातील औद्योगिक प्रदूषणाची मुहूर्तमेढ रोवली.

 पर्यावरणाचा प्रश्न हा शेतीमालाच्या भावाच्या समस्येतून तयार झालेल्या आपत्तींपैकी एक आहे. काही प्रमाणात तंत्रज्ञानातील त्रुटी आणि दोष यांमुळेही पर्यावरण आणि प्रदूषणाच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत; पण या बाबतीत कोणालाही निर्दोष तंत्रज्ञान आपण उभे करू शकू अशी शेखी मिरवता येणार नाही. नवीन शोध लावता लावता चुका करत आणि त्या सुधारतच माणसाची प्रगती होऊ शकेल. अशीच परिस्थिती वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलही आहे. उदाहरणार्थ, नर्मदा प्रकल्पाचा पर्यावरणावर काही विपरित परिणाम होईल हे उघड आहे; पण, नर्मदामातेचा जलौघ समुद्रात जाऊन पडत राहिला तर त्याचेही काही पर्यावरणी दुष्परिणाम आहेत हे डोळ्याआड करून चालणार नाही. राजस्थानच्या वाळवंटात पाणी न्यावे, तेथे हिरवळ करावी या योजनेला सर्व पर्यावरणवादी साहजिकच पाठिंबा देतील, पण वायव्येतील वाळवंटे संपली तर सर्व मान्सून व्यवस्था ढासळून जाईल अशी शास्त्रज्ञांना गंभीर चिंता आहे. खरीखुरी परिस्थिती काय आहे याविषयी कुणीच फार अहंकाराने बोलू शकणार नाही.

 नीरोची पिलावळ

 पर्यावरणवादी आणि पर्यावरणवाद यांची ही एकूण अशी नाजूक अवस्था आहे तरीही त्यांची मोठी चलती दिसते आहे. याचे कारण पर्यावरणाच्या नावाखाली शेतकरीविरोधी व्यवस्था आणि नोकरशाही चालू ठेवणे व भरभराट करणे या शहरी भद्र लोकांच्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाकरिता ही मंडळी तत्त्वज्ञानाचा एक डोलारा तयार करताहेत. अर्थशास्त्रात नियोजन निरर्थक ठरले असेल; पण

भारतासाठी । ४८