पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


राज्य संपविण्याच्या आरोळ्या चौफेर उठत आहेत म्हणजे नेहरूवाद संपला आहे असे नाही. समाजवाद हटला, नियोजनाची भांडेफोड झाली आणि शास्त्रविज्ञानाच्या घोषणांतील उथळ भंपकपणा सिद्ध झाला. नेहरूवादाचे तीनही पाय तटले तरी नेहरूवाद जिवंतच आहे. खरा नेहरूवाद म्हणजे येन केन प्रकारेण शहरी, आंग्लविद्याविभूषित भद्र लोकांचे कल्याण साधणे. नेहरूंनी हे कल्याण समाजवाद नियोजन, विज्ञान या त्रयीने करण्याचा उपद्व्याप केला. आता ही नाणी चालत नाहीत म्हणून “स्वातंत्र्य", "खुली बाजारपेठ" असल्या फसव्या घोषणा करत नवे शासन पुढे सरसावले आहे. नेहरूवादावर उघडपणे हल्ला करण्याची हिंमत नरसिंहराव दाखवत नाहीत, मनमोहन सिंगही दाखवत नाही. यात राजकीय सोय असेलही; पण नेहरूंचे अवडंबर संपविण्याची व्यापक मोहीम नव्या अर्थव्यवस्थेचे प्रणेते घेत नाहीत. कारण अखेरीस त्यांचे आणि नेहरू व्यवस्थेचे आंतरिक हेतू समानच आहेत. सगळे नवे स्वातंत्र्य आणि स्वच्छ हवा शहरांपुरतीच मर्यादित राहावी, कारखानदारांना तिचा लाभ व्हावा पण शेतकऱ्यांना मात्र या नवीन युगाचा संपर्क होऊ नये असे भरकस प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न शासनाला फारसे परवडणारे नाहीत तरीही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, शासन प्रयत्न करीत राहाणार आहे.
 दुटप्पी तत्त्वज्ञान
 पण नव्या अर्थव्यवस्थेचा उद्घोष करणाऱ्यांच्या मार्गात एक मोठी अडचण आहे. खुल्या व्यवस्थेच्या नावाने कारखानदारांना सर्व सोयीसवलती द्यायच्या पण परदेशांतल्या महागड्या गव्हाची मात्र भरपेट आयात करायची, कापूस, कांद्यांवर निर्यातबंदी घालायची, शेतीमालाच्या प्रक्रियेवर आणि विक्रीवर बंधने लादायची अशा दुटप्पी वागणुकीचे समर्थन कसे करायचे? थोडक्यात, नेहरू - नियोजनांत इंडिया-भारत सावत्रपणा खपून गेला. खुल्या स्वतंत्र व्यवस्थेत अशा भेदाभेदांचे काय तत्त्वज्ञान सांगायचे? खुल्या बाजारपेठेच्या मुक्त व्यवस्थेत शेतकऱ्यांवर तेवढी गुलामी लादूनच ठेवायची हे दिसायलाहीतरी विचित्र दिसेल; असल्या पक्षपातीपणाचे आणि शेतकरी दुष्टाव्याचे समर्थन तरी कसे करावे, त्याचे तत्त्वज्ञान कोणते मांडावे याची मोठी चिंता दुनियाभरच्या 'इंडिया'वाद्यांना पडली आहे!

 शेतकऱ्यांवरच्या या जुलुमाचे समर्थन आणि तत्त्वज्ञान उभे करण्याचे काम एक नवाच कंपू करू पाहातो आहे. वेगवेगळ्या मिषाने आणि निमित्ताने शेतकऱ्यांविरुद्ध ही मंडळी गनिमी काव्याने लढण्यास सज्ज झाली आहे. या

भारतासाठी । ४३