Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

औद्योगीकरणाचा आग्रह धरला. समाजवादी उद्योगधंद्यांच्या विकासासाठी स्टॅलिनने शेतकऱ्यांवर रणगाडे घातले. पंडितजींनी राष्ट्र आणि समाजवाद यांच्या जोडीला शास्त्र-विज्ञानाची नवी सबब काढली. नेहरूप्रणीत समाजवाद आणि नियोजन यांचा खरा मतितार्थ जसा नेहरूंच्या रसिक काव्यात्मकतेत होता तसाच शास्त्रविज्ञानाचा आग्रहही काव्यात्मकच होता.

 तिसऱ्या जगाचे नेते म्हणून राष्ट्रभर फिरावे. इतर देशांतील नेत्यांनाही भारतात आणावे. त्यांच्या देशातील प्रेक्षणीय स्थळांना आपण इतमामाने भेटी द्याव्या आणि परदेशी पाहुणे हिंदुस्थानात आले म्हणजे त्यांना दिपवण्यासारखी काही आधुनिक स्थाने आपल्याकडेही असावीत ही त्यांची खरी उर्मी होती. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाच्या वेळी येणाऱ्या सुवासिनींवर छाप पाडण्यासाठी गृहिणी जशा इकडून तिकडून उधार उसनवारीने खेळणी, चित्रे आणून गौर सजवतात तसा प्रकार नेहरू-नियोजनाचा होता, समाजवादाचा होता आणि विज्ञानप्रेमाचाही होता.

 पन्नास वर्षांच्या औद्योगीकरणाच्या खटाटोपानंतर भारतासारख्या देशांची शास्त्रविज्ञानात अशी काही प्रगती झाली नाही. उलट. पन्नास वर्षांपर्वी शास्त्रविज्ञानात सुधारित जगाच्या तुलनेने ते जितके मागासलेले होते त्यापेक्षा आज अधिक मागास पडले आहेत.

 'नीरो'ची प्रतिभा

 नेहरूंच्या रसिकतेपोटी देशाची फाळणी झाली आणि या रसिकतेपोटीच देश दिवाळखोर झाला. एवढेच नव्हे तर कोट्यवधी संसार बेचिराख झाले. रोम साम्राज्याचा बादशाह नीरो याने आपल्या प्रतिभाविलासाकरिता साऱ्या शहराला आग लावली व ते भव्य भयाण दृश्य पाहत तो आपले तंतुवाद्य वाजवीत होता असे म्हणतात. इतिहासाची साक्ष आहे की नेहरू हे भारताचे नीरो होते.

 समाजवादाचा आता वैश्विक पराभव झाला आहे. नियोजन ही संकल्पनाच अव्यवहार्य आहे असे या व्यवस्थेचे गंभीरपणे प्रयोग केलेले देशही मान लागले आहेत. खुली बाजारपेठ ही काही आदर्श व्यवस्था आहे असे नाही, पण खुल्या बाजारपेठेपेक्षा जास्त सोयीस्कर असा दुसरा पर्याय नाही हे जगन्मान्य होऊ लागले आहे. तिसऱ्या जगातील नियोजनाचा बडेजाव मिरविणारे सगळे देश दिवाळे काढून हाती भिक्षापात्रे घेऊन उभे आहेत.

 नवे 'नीरो'

 खुल्या बाजारपेठेचा उद्घोष आता, ज्यांची सगळी हयात नेहरू-नियोजनाचा पुरस्कार करण्यात गेली असे श्रेष्ठही करू लागले आहेत. लायसेन्स-परमिट

भारतासाठी । ४२