"शेतकऱ्यांना शेतीमाल देशात किंवा देशाबाहेर विकण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्यामुळे ग्रमीण भागातील लोकांवर, निसर्गावर आणि एकूणच अन्नसंस्कृतीवर विपरित परिणाम होईल.”
"शेतीच्या कामातून निघून दुसऱ्या व्यवसायात जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बंधने असली पाहिजेत."
ही मते आणि विधाने कोणाची असावीत? एकेकाळी राव वीरेंद्रसिंग किंवा प्रा. दांतवाला यांसारखी मंडळी शेतकऱ्यांविरुद्ध अशी गरळ खुलेआम ओकत असत. शेतकरी आंदोलन चालू झाल्यापासून असे लिहिण्या-बोलण्याची फारशी हिम्मत सहसा कोणी करीत नसे; पण, पुन्हा असा विचार मांडणारे एक नवा मुखवटा घेऊन पुढे येत आहेत.
लुटीची तत्त्वज्ञाने
शेतीमध्ये होणाऱ्या गुणाकाराची लूट करणाऱ्यांनी इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या सबबी आणि तत्त्वज्ञाने सांगितली आहेत. धर्मप्रसाराकरिता म्हणून शेतकऱ्यांची लूट झाली, धर्मसंरक्षणाकरिता शेतकऱ्यांची लूट झाली, राष्ट्रसंरक्षणाच्या नावाने शेतकऱ्यांची लूट झाली आणि दुसऱ्या देशावर आक्रमण करून स्वराष्ट्राची शान वाढविण्याच्या घोषणेखालीही शेतकऱ्यांची लूट झाली. पृथ्वीच्या पाठीवर सर्वत्र साम्राज्य पसरविणाऱ्यांनी वसाहती तयार केल्या; त्यासाठीसुद्धा त्यांनी धर्मप्रसार आणि संस्कृतीप्रसार (White Man's Burden) यांची सबब सांगितली.
स्वातंत्र्यानंतर, गोऱ्या इंग्रजांच्या आमदनीतील गांधीजींचा आर्थिक दृष्टिकोन नेहरूंनी पायदळी तुडविला आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारित अशी औद्योगीकरणाची योजना आखली. या औद्योगीकरणाच्या धोरणाचा पाठपुरावा