पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/334

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिवसेना यांना मोठे अवघड वाटत आहे.

 थोडक्यात, राष्ट्रापुढील भयानक प्रश्न सोडवण्यासाठी शुद्ध राष्ट्रवादी, स्पष्ट आर्थिक विचार असलेला पर्याय मतदारांसमोर नाही.

 या महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची पार्श्वभूमी ही अशी आहे. याच अंकात संपादकांनी २००४ सालच्या निवडणुकांनंतर मी केलेल्या परिस्थितीच्या अवलोकनासंबंधीचा 'राजकीय भूमिकेचा चक्रव्यूह' हा लेख पुनर्मुद्रित केला आहे. वाचकांच्या लक्षात सहज येईल की २००४ नंतर परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

 देश वाचवण्याचे ज्यांना महत्त्व वाटत नाही त्यांना या सर्वच परिस्थितीशी ना देणे, ना घेणे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात देशभक्ती हा एक पागलपणाचा प्रकार मानला गेला. 'जय जगत्'च्या नाऱ्याखाली राष्ट्रप्रेम झाकोळून टाकण्यात आले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वीर सावरकर यांच्या ज्वलंत राष्ट्रप्रेमाची ज्योत पुन्हा चेतवली तरच देश वाचू शकतो. अन्यथा, गांधीनेहरूंचे तकलादू स्वातंत्र्य, पहिले प्रजासत्ताक हे सारेच एक भयानक दुःस्वप्न पडून गेले असे समजून पुन्हा एकदा भारताच्या दुसऱ्या आणि खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी नव्याने राष्ट्रउभारणीच्या यज्ञाचे होमकुंड चेतवणारा ऋत्विज देशाला शोधावा लागेल.

(२१ मार्च २००९)

◆◆◆
भारतासाठी । ३३४