पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/331

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उरावर बसतील. भारतातील गरिबांवर दया करा आणि या नंग्या फकिराच्या भुसकट सहकाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका." चर्चिलचा कोणी राग करो, तिरस्कार करो; तो एक महान दृष्टा होतो हे कोणाला नाकारता येणार नाही.

 प्रांताप्रांतांतील आदिवासी समाजांनी आणि भद्र समाजातील काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचे केलेले उठाव इंग्रजांनी निघृणपणे दडपून टाकले. परिणामी, इंग्रजी सत्ता आणि शासन यांच्याशी सशस्त्र संघर्ष करण्यासाठी आवश्यक ती बांधणी, साधनसंपत्ती त्याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करणे या पिढीततरी शक्य होणार नाही अश्या निराशाग्रस्त भावनेने भारतीय जनतेने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. सत्य आणि अहिंसा या शस्त्रांनी व्यापक जनजागृती घडवता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिले होते. गांधी भारतात परतल्यावर सर्वच जहालपंथी निष्प्रभ झाले; स्वातंत्र्यलढ्याचे अनभिषिक्त नेतृत्व गांधींकडे आले.

 'बिहारमध्ये भूकंप होऊन हजारो लोक मेले हा अस्पृश्यतेबद्दल मिळालेले प्रायश्चित्त आहे' असे अकटोविकट तर्कटही लोकांनी मुकाटपणे गिळले. चौरीचौरातील रणछोड नीतीचेही त्यांनी स्वागत केले. 'नौखालीतील हत्याकांड आपल्या व्यक्तिगत ब्रह्मचर्यातील कमजोरीमुळे झाले' हेही ऐकून घेतले. सुभाषचंद्र बोसांचा मोठ्या कारस्थानीपणाने केलेला तेजोभंग लोकांनी पाहिला. भगतसिंगांसारख्या हुतात्म्यांना 'वाट चुकलेले देशभक्त' असे नामाभिधान दिल्याचेही पाहिले. दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धातील इंग्रज सैन्यात भरती करण्यासाठी मोहीम चालवणारे गांधी महात्मा ठरले आणि दुसरे महायुद्ध ही इंग्रजांच्या विरोधात आवश्यक बांधणी, सामग्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करण्याची संधी आहे असा विचार मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवले गेले.

 भारताला स्वातंत्र्य मिळाले याचे प्रमुख श्रेय हिटलरकडे जाते. जर्मनीने इंग्रजी साम्राज्याच्या नाकी नऊ आणले नसते तर इंग्रज भारतातील साम्राज्य सोडण्यास कधीही तयार झाले नसते.

 सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमुळे भारतीय फौजेत प्रक्षोभ माजला नसता आणि मुंबईतील खलाश्यांच्या बंडामुळे देशी सैन्याची स्वामीनिष्ठा हादरली नसती तर दुसऱ्या महायुद्धानंतरही इंग्रज भारत सोडून गेले नसते. काँग्रेस, गांधीजी, नेहरू यांना स्वातंत्र्याचे श्रेय अनाठायी मिळाले.

 "मागू नका कधीही, कुणी राज्य काय दिधले?" किंवा कवी गोविंदाची 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?" या साऱ्या विचारधारेचाच अधिक्षेप झाला

भारतासाठी । ३३१