पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/329

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरते. प्रत्येक देशाने आपलेआपले व्यक्तिमत्त्व, संस्कृती, इतिहास आणि अर्थकारण जोपासावे. यासाठी राष्ट्र ही संकल्पना महत्त्वाची आहे. देशामध्ये व्यक्तीला आणि जगामध्ये इतिहास, भाषा, वंश आणि संस्कृती यांच्या आधाराने उभ्या राहिलेल्या राष्ट्रांना सर्वोपरी स्थान असले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या माझ्या निष्ठेतूनच राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती यांचा उगम होतो.

 "जन्माच्या अपघाताने लाभलेल्या धर्म, भाषा, वंश, जाति यांचा अभिमान बाळगणे हे क्षुद्रवादाचे लक्षण आहे. याउलट, आजच्या परिस्थितीत, 'राष्ट्र' या संकल्पनेला मोठे महत्त्व आहे.

 "अमेरिकेतील स्वतंत्रावादी, आयन रॅण्डचा अपवाद सोडल्यास, राष्ट्रभावनेला महत्त्व देत नाहीत किंवा त्या भावनेचा उपहासच करतात. माझे असे नाही. क्षुद्रवादाच्या माझ्या व्याख्येला अपवाद करत मी 'राष्ट्र' या संकल्पनेचे महत्त्व मानतो. एका अद्भुत जैविक बांधणीमुळे व्यक्तीला अनुभूती घेण्याची आणि विचार करण्याची शक्ती मिळते. अशीच शक्ती राष्ट्र या बांधणीलाही असते अशी इतिहासाची साक्ष आहे.

 "इतिहासामध्ये अनेक घडामोडी घडतात. सदासर्वकाळ राष्ट्रभावना सारखीच जाज्ज्वल्य राहिली असे नाही. व्यक्ती हे अनुभूतीचे आणि विचाराचे अनंतकालीन एकक आहे. माणसाने या शक्तीचा ईश्वरी ठेवा शाबूत ठेवण्यासाठी वेगवेगळे गट आणि संघटना तयार केल्या. जंगली माणसाच्या टोळ्या झाल्या, जातिव्यवस्थेची स्थापना झाली, धर्म, भाषा, वंश आणि भौगोलिक सलगता यांच्या आधाराने राष्ट्र उभी राहिली. हजारो वर्षांच्या आक्रमणांच्या, लढायांच्या आणि साम्राज्यवादाच्या इतिहासाने राष्ट्रांच्या भौगोलिक नकाशांची वारंवार आखणी आणि फेरआखणी केली; जगातील आजचे सर्व महत्त्वाचे देश जुन्या काळच्या विविध संघराज्ये आहेत.

 "आजच्या इतिहासात या संघराज्यांना जोडणारी महासंघराज्ये करण्याचाही कल आहे. याउलट, संघराज्यांचे विभाजन होऊन जास्त एकसंघ राष्ट्रे उभी रहाण्याचाही कल दिसतो. जगाची विभागणी आज राष्ट्रांत झाली आहे; उद्या ती, कदाचित, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत होईल. एक गोष्ट निश्चित की, जागतिक व्यवस्थेत स्पर्धेत उतरणाऱ्या राष्ट्रसदृश संघटनांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे."

 रिचर्ड या विद्यार्थ्याला मी हा मुद्दा इतक्या तपशीलाने सांगितला कारण हे बोलताना भारतातील आजच्या परिस्थितीत या सर्व सिद्धांतांचे संदर्भ मला जाणवत होते.

भारतासाठी । ३२९