पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/327

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे टाळता येईल. शिवराज पाटील तसे सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्याशी बोलताना आपण नक्षलवाद्यांचा सामना करण्यात आणि मुसलमानी आतंकवादाला तोंड देण्यात अपुरे पडत आहोत याची खंत त्यांच्या अंतर्मनात वाटत असे अशी मला अनेकदा जाणीव झाली आहे. पाटील पक्षनिष्ठेने भारले आहेत. २००४ सालच्या निवडणुकीत रूपाताई निलंगेकरांसारख्या साध्या गृहिणीने त्यांचा पराभव करावा ही गोष्ट त्यांना खूप लागली होती. अश्याही परिस्थितीत सोनिया गांधींनी मेहेरबानी करून त्यांना राज्यसभेत घेतले, एवढेच नव्हे तर ज्या आसनावर सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत अशा दिग्गजांचा स्पर्श झाला त्या जागेवर बसवले या विषयीच्या कृतज्ञतेपोटी ते सर्वसमावेशकता आणि भोंदू निर्धार्मिकता यांची नौटंकी इतकी मनापासून करतात की त्यांची स्वतःची या पोकळ तत्त्वज्ञानाबद्दल खात्री पटली आहे.

 अलीकडे मालेगाव प्रकरणात अटक झालेल्या साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इत्यादींची नार्को टेस्ट घेण्यात आली. शिवराज पाटील यांचीही नार्को टेस्ट घेतली तर कोणत्या मानसिकतेतून त्यांनी जाणूनबुजून नक्षलवाद्यांचा विस्तार वाढू दिला, धार्मिक आतंकवाद्यांचा कठोरपणे पाठपुरावा केला नाही आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे दाऊद इब्राहिम याच्याशी खुल्लम खुल्ला संबंध माहीत असतानाही त्या नेत्यांना अटक केली नाही हे साऱ्या जगापुढे येणे आवश्यक आहे. शिवराज पाटलांची नार्को टेस्ट केल्यास गेली पाच वर्षे दिल्लीतून चालवले जाणारे हे देशबुडवे कारस्थान उघडकीस येईल आणि कदाचित....

 कदाचित, भारतीयांचे देशप्रेम जागृत होऊन लोकमान्य टिळकांच्या निर्वाणानंतर देशावर आलेले नेभळटपणाचे सावट दूर होईल.

(३० डिसेंबर २००८)

◆◆

भारतासाठी । ३२७