पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/307

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नरसिंह राव यांचे अर्थमंत्री अर्थशास्त्री, त्यांचा अनुभव प्रामुख्याने बिगरशेती क्षेत्रातला; पण 'शेतकऱ्याचे मरण, हेच सरकारचे धोरण' या परिस्थितीकडे त्यांचे विशेष लक्ष गेले नाही.

 त्याआधी १० वर्षे, चीनमध्ये आर्थिक सुधारांची सुरुवात झाली होती. तेथे प्राधान्याने शेतीवरील निर्बंध काढून टाकण्यात आले होते आणि सामूहिक शेतीऐवजी शेतकऱ्यांच्या खासगी उत्पादनास बढावा देण्यात आला. परिणामी, तेथे जो चमत्कार घडला तो सर्वविदितच आहे. भारतातमात्र असे घडले नाही. समाजवादाच्या काळात शेतीचे शोषण झालेच, पण आर्थिक सुधारांच्या पहाटेनंतरही शेतीमालाच्या वाहतुकीवरील, साठवणुकी-वरील, व्यापारावरील, प्रक्रियेवरील आणि निर्यातीवरील बंधने उठविली गेली नाहीत; कायमच राहिली.

 जमिनीचा सैद्धांतिक मालकीहक्क सरकारकडेच राहिल्यामुळे शेतकऱ्यांना नवी गुंतवणूक करण्याची उमेद आली नाही. त्यामुळे, आर्थिक सुधारांचा परिणाम म्हणून कारखानदारीच्या क्षेत्रात जो चमत्कार घडला त्याची झलकही शेतीच्या क्षेत्रात दिसू शकली नाही. भारताच्या गेल्या पंधरा वर्षांतील आर्थिक प्रगतीचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना देताना शेती क्षेत्र मागास ठेवल्याबद्दल दोषाचे मापही त्यांच्या पदरात घालावे लागेल.

 हरित क्रांतीनंतर २० वर्षे रासायनिक खते आणि औषधे यांच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता घटत चालली होती आणि शेतीमालाला मिळणारा भाव पाडण्याचे सरकारी धोरण चालूच राहिले. त्यामुळे, शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा वाढत राहिला. परिणामतः, १९९५ सालापासून जवळजवळ दीड लाख शेतकऱ्यांनी विष पिऊन किंवा फाशी लावून घेऊन जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

 नरसिंह राव यांच्या काळात आणखी एक मोठे प्रकरण उभे राहिले. विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार पाडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अयोद्धयेतील राम मंदिराचा प्रश्न निकराने हाती घेतला. रथयात्रा निघाल्या, देशाच्या कोन्याकोपऱ्यातून विटा जमा झाल्या, मोठ्या संख्येने रामसैनिकही अयोद्ध्येकडे जाऊ लागले. 'मंदिर वहीं बनाएंगे' म्हणजे जेथे बाबरी मशीद आहे तेथेच मंदिर बनविण्याचा आग्रह असल्यामुळे जातीय/धार्मिक वैमनस्य आणि दंगे वाढण्याचा प्रचंड धोका होता. शेवटी, ६ डिसेंबर १९९३ रोजी रामसैनिकांनी पहाता पहाता बाबरी मशिदीची वीट न् वीट उखडून टाकली. या कृत्यात रामसैनिकांना भडकवून देणारी भाषणे करणाऱ्या नेत्यांचा सहभाग होताच, पण त्यापलीकडे, तेथील बंदोबस्तावरील सर्व पोलिस दलाच्या जवानांच्या मनातील रामाबद्दलची भावनाही कारणीभूत

भारतासाठी । ३०७