पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/303

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यक्ष श्री. डी. एस्. त्यागी यांची हत्या आणि एअर इंडियाचे सबंध विमान उडवून देणे यांत त्यांनी दाखविलेल्या क्रूरतेमुळे खलिस्तानी कोठे हल्ला करतील याची कोणालाही शाश्वती देता येत नव्हती. खलिस्तानच्या घोषणा आणि ध्वजारोहण देशात व परदेशांतही होत होते. पाकिस्तानच्या मदतीने खलिस्तानवादी अतिरेकी बेबंद बनले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी नेमलेले श्री. रिबेरो अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले होते. पंजाबमधल्या कोणत्याही खेड्यात जाणे सशस्त्र संरक्षणाखेरीज अशक्य झाले होते. एका अर्थाने पंजाबवर सत्ता खलिस्तानवाद्यांचीच चालली होती; पण, अश्याही परिस्थितीत धैर्याने सामना देऊन एकएक आतंकवादी गट टिपून काढीत खलिस्तानी उठाव संपविण्यात नरसिंह राव यांनी यश मिळविले.

 त्याआधी किंवा त्यानंतर असे यश कोणाला कमावता आले नाही. आजही ईशान्येतील टोळ्यांची बंडखोरी, जम्मू-काश्मिरातील पाकिस्तान्यांची बंडाळी किंवा नेपाळच्या सरहद्दीपासून केरळपर्यंत हुकुमत चालविणारी नक्षलवाद्यांची बंडखोरी यांचा बंदोबस्त मनमोहन सिंग यांच्या सरकारलाही जमलेला नाही. नरसिंह रावांच्या काळी सारा देश आर्थिक विपन्नावस्थेत होता तरीही नरसिंह रावांनी ही कामगिरी करून दाखविली. आज देश आर्थिक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे अश्या वल्गना केल्या जात आहेत; पण, दररोज घातपाती कृत्यांत, बाँब स्फोटांत शेकडो निरपराध नागरिक आणि सैनिकही मारले जात असताना अतिरेक्यांचा बंदोबस्त होत नाही. मोठमोठे नेते आपली असमर्थता लपविण्यासाठी निर्धार्मिकतेचा आणि गरीबगुरीब जनतेच्या कळवळ्याचा बुरखा पांघरीत आहेत.

 पंजाबमधील बंडाळी मोडून काढणे ही नरसिंह रावांची किरकोळ कामगिरी झाली; त्यांची खरी मोठी कामगिरी आर्थिक क्षेत्रात घडली.

 प्रत्यक्ष स्वातंत्र्य पदरात पडण्याच्या आधीपासून आपली प्रतिमा काँग्रेसमधे थोडी जहाल रहावी यासाठी पंडीत नेहरू समाजवादाचा पुरस्कार करीत असत. त्यांची अर्थकारणातील मते महात्मा गांधींना बिलकुल पटत नसत. एका पत्रव्यवहारात गांधीजींनी 'प्रिय जवाहर'ला निक्षून सांगितले होते की, अशी तुमची मते असतील तर त्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या काळातही मला उठावे लागेल.

 १५ ऑगस्ट १९४७ पासून चारपाच महिन्यांतच नेहरूंची पावले भलत्याच दिशेने जात आहेत हे गांधीवाद्यांच्या लक्षात येऊन चुकले. याच आक्रोशातून साने गुरुजींसारख्या निर्मळ मनाच्या गांधीवाद्याला जीव नकोसा झाला. १९४८ सालच्या

भारतासाठी । ३०३