पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/302

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





नरसिंहरावांच्या कारकीर्दीचे वेगळेपण


 काॅंग्रेस पक्षाचा नेहरू-गांधी घराण्याबाहेरील लाल बहादूर शास्त्री सोडता पहिला पंतप्रधान ही जबाबदारी त्यांच्यावर होतीच. राजीव गांधी भर तारुण्यातील आणि नेहरू घराण्याच्या प्रभावळीतील. त्यातून आईच्या मृत्युच्या प्रसंगी बजावलेल्या धीरोदात्त भूमिकेमुळे सहानुभूतीच्या लाटेवर लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळविलेले. त्यांच्या तुलनेत नरसिंह राव वयोवृद्ध, परंपरेची प्रभावळ नाही, पक्षातील अनेक जुने नेते त्यांच्या नेमणुकीमुळे दुःखी झालेले आणि सगळ्यात वरकडी म्हणजे लोकसभेत हुकुमी बहुमतसुद्धा नाही. लोकसभेत हुकुमी बहुमत नसलेले ते काँग्रेसचे पहिले पंतप्रधान.

 पण, सर्व बाबी अनुकूल असतांना राजीव गांधी यांनी पाच वर्षांत सत्ता गमावली तर एकही गोष्ट अनुकूल नसतांना नरसिंह रावांनी पाच वर्षांच्या काळात मोठी कामगिरी करून दाखविली.

 नरसिंह राव मृदुभाषी. विनाकारण टेंभा मिरविण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. आपली वास्तविक कामगिरी जरी लोकांपुढे मांडली तर ती 'घराण्या'ला पसंत पडेल की नाही ही धास्ती. त्यामुळे, त्यांचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत फारसे भरले नाही.

 नरसिंह राव यांनी दोन 'न भूतो न भविष्यति' असे चमत्कार करून दाखविले. पहिला चमत्कार म्हणजे, १९८४ सालापासून पेटत असलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांचा बीमोड करणे. खालिस्तानी आतंकवाद्यांची कृत्ये अधिकाधिक भयानक होत होती. दिवसाढवळ्या बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून बिगरशीख प्रवाशांना गोळ्यांच्या वर्षावात ठार करणे येथपासून ते निवडक नामवंतांना टिपून मारणे हा त्यांच्या हातचा खेळ झाला होता. पुण्यात झालेली जनरल वैद्य यांची हत्या, दिल्लीतील कृषि उत्पादनखर्च व मूल्य आयोगाचे

भारतासाठी । ३०२