पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/296

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रास्त भाव मिळू नये यासाठी एक क्लुप्ती योजली. इंदिराजींच्या कारकीर्दीपासून कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी शेतकरीद्वेष्टा कम्युनिस्ट किंवा डाव्या पठडीचा नेमण्याचा पायंडा पडला तो आजतागायत चालू आहे. १९७५ सालापर्यंत देशातल्या शेतीची स्थिती अशी झाली की शेतकरी जितके अधिक पिकवतील तितके त्यांच्या हाती पडणारे उत्पन्न कमी. अशा परिस्थितीत देशभर असंतोषाचे वादळ उठले, इंदिराबाईंवर पदच्युतीची वेळ आल्यावर त्यांनी देशावर आणीबाणी लादली.

 आणीबाणी संपली. थोड्याच काळात जनता पक्षाची राजवटही संपली. इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या. अखंड काँग्रेसच्या सत्तेच्या काळात परंपरागत विरोधी पक्षतरी जनतेच्या प्रश्नांना काही वाचा फोडीत. त्या पक्षांवरही आता लोकांचा विश्वास राहिला नाही. शेतीउत्पादन आणि उत्पन्न यांचे व्यस्त प्रमाण आणि राजकीय पक्षावरील अविश्वास यातून शेतकरी आंदोलनाची पहाट उगवली आणि थोड्याच काळात तामिळनाडूपासून पंजाबपर्यंत वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक शेतकरी आंदोलने उभी राहिली आणि त्यांना शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबाही मिळू लागला.

 नेहरू-गांधी घराण्याची समाजवादी विचारपठडीची धोरणे चालत राहिली. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेतून पंजाबसारख्या राज्यांत असंतोषाची लाट उसळून तिने खलिस्तानच्या मागणीचेही रूप घेतले. इंदिराजींच्या कारकीर्दीचा शेवटचा काळ आर्थिक प्रश्नांना डावलून बांगला देश स्वातंत्र्य लढा, खलिस्तानी आतंकवाद आणि काँग्रेसमधीलच दुफळी हे प्रश्न सोडविण्यात गेला.

 खलिस्तानी आतंकवाद निपटून काढण्यासाठी बाईंनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील अकाल तख्तावर लष्करी कारवाई केली. सारा शीख समाज दुखावला गेला आणि त्यातच बाईंना हौतात्म्य पत्करावे लागले.

 बाईंना दोन मुले. राजकारणात रस असलेला संजय आणि राजकारणात पडण्यासाठी शिक्षण व अनुभव नसलेला राजीव. संजय बाईंच्या मृत्यूआधीच विमान अपघातात मृत झाला. पहिली सून मनेका गांधी हिच्याशी बाईंचे जमले नाही म्हणून तिने सासूचे घर सोडून दिलेले. गादीवर बसण्यास एकमेव वारस राजीव गांधी. त्याला घाईघाईने कलकत्त्याहून बोलावून गादीवर बसवण्यात आले.

 शेतीक्षेत्राच्या दृष्टीने उल्लेख करण्यासारख्या राजीव गांधीच्या काळात दोनच घटना घडल्या. त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच कृत्रिम धाग्याचे कारखानदार अंबानी आणि वाडिया यांची हनुमान उडी आणि स्पर्धा

भारतासाठी । २९६