पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/286

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





साठ वर्षांच्या कर्माचे फळः
अतिरेक्यांचा आड आणि नक्षलवाद्यांची विहीर


 १९९८च्या डिसेंबर महिन्यात शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांनी अमरावती येथे जनसंसद भरवली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५० वर्षांच्या काळात देशाने काय कमावले काय गमावले याचा ताळेबंद काढण्यासाठी ही जनसंसद भरवण्यात आली होती. तीन दिवसांच्या चर्चेनंतर जे काही सार निघाले ते 'स्वातंत्र्य का नासले?' या माझ्या पुस्तिकेत मांडलेले आहे.

 ५० वर्षांच्या काळात स्वातंत्र्याचे दूध नासले. नासलेले दूध, काही केले तरी, पुन्हा पहिल्यासारखे करता येत नाही असे म्हणतात; पण, नासलेल्या दुधाचेसुद्धा अनेक उपयुक्त पदार्थ करता येतात हे सगळ्या दूध सोसायट्यांच्या अध्यक्षांना चांगले माहीत आहे. दूध नासले नसले तरी ते नासले असे दाखवून त्याचे तूप वगैरे करून त्यातून ही मंडळी भरपूर फायदा कमावतात.

 अमरावतीची जनसंसद होऊनही आता दहा वर्षे झाली. त्या दहा वर्षांत काही वेगळी कलाटणी देऊन देशाला उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी काही प्रगती झाली आहे काय याचा आढावा घेण्यासाठी, खरे म्हटले तर, पुन्हा एकदा जनसंसद भरवायला पाहिजे.

 १९९७ साली म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षी मी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव समितीचा सदस्य होतो. सुवर्णमहोत्सव साजरा करण्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली होती; पण, प्रत्यक्षामध्ये जनतेचा उत्साहमात्र अत्यंत थोडा दिसला; सर्व सुवर्णमहोत्सवाला स्वरूप आले ते सरकारी कार्यक्रमांचे.

 सन २००६च्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाची परिस्थितीतर याहूनही विचित्र होती. ११ जुलै रोजी मुंबईला झालेले बाँबस्फोट, त्यानंतर आंतकवाद्यांनी लंडनच्या विमानतळावरून अमेरिकेत जाण्यासाठी सुटणारी दहा विमाने पाडण्याचा रचलेला

भारतासाठी । २८६