पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/285

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुस्थानात मात्र मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि ख्रिश्चन काँग्रेस अध्यक्षा अशी सहिष्णुता उघडपणे नांदते. अल्पसंख्याकांचा कडवेपणा आणि बहुसंख्य समाजाची सहिष्णुता हे एकमेकांत सहज मिसळणारे नाही.

 याला उत्तर काय? याला उत्तर एकच आहे. स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचार ही एकमेव औषधाची गुरुकिल्ली आहे. जर का अल्पसंख्यांक समाजाने आपला हेकटपणा सोडला नाही आणि आपली वेगळी कडी करून त्यातच पुरुषार्थ मानण्याचे तत्त्वज्ञान सोडले नाही तर इतिहासात त्यांना स्थान मिळणार नाही. याउलट, जर का आपापल्या धर्माविषयी योग्य तो आदर बाळगून, पण मनाचे मोकळेपण, विचारांचे स्वातंत्र्य आणि ज्ञानाची देवघेव हे सिद्धांत त्यांनी मान्य केले आणि, त्याबरोबरच व्यक्तिमाहात्म्य आणि ग्रंथप्रामाण्य यांचाही त्याग केला तर या समाजाला भविष्यात पुढे येणाऱ्या खुल्या व्यवस्थेत प्रचंड वाव आहे. मुसलमान समाजावर अन्याय होतात ते आर्थिक; पण, हे आर्थिक अन्यायसुद्धा त्यांच्या स्वतःला कोंडून घेण्याच्या प्रवृत्तीतूनच तयार झाले आहेत; पण, या अन्यायाच्या काळामध्ये मुसलमान समाजातील तरुण माणसांनी काही मोठे गुण अंगी बाणवले आहेत. मुसलमान तरुण इमान मानतो, प्रामाणिकपणे काम करतो, एवढेच नव्हे तर, या जगात कायमची नोकरी आणि आश्वस्त भविष्य या कल्पना त्याला अनोख्या आहेत. एका दिवशी सकाळी एका कारखान्यात काम तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या कारखान्यात अशा सतत उलाढाल आणि बदल घडणाऱ्या जीवनाची त्याला सवय आहे. एक तऱ्हेने उद्योजकतेला लागणारे गुण मुसलमान समाजाने आपल्या अंगी बाणवलेले आहेत.

 या गुणांचा उपयोग नव्या येणाऱ्या खुल्या व्यवस्थेमध्ये त्यांना आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती करून देण्याकरिता करता येईल; पण, त्याच गुणांचा उपयोग रुढीनिष्ठ समाजांना मजबुती देत देत आणि सगळ्या जगाविरुद्ध भांडण करत करत केला तर सगळ्या जगभर पसरलेल्या इस्लामचे आणि आजही अनेक शोषित समाजांना ज्याचे आकर्षण वाटते, त्या इस्लामचे भविष्य काही फारसे उज्ज्वल राहणार नाही.

(६ ऑगस्ट २००६)

◆◆

भारतासाठी । २८५