पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/281

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

थेंब पडला असेल, त्या तेवढ्याच मुंग्या बावरल्यासारख्या होतात, काही वेळ स्तब्ध होतात, काही वेळ मागे किंवा डावीउजवीकडे धावपळ करतात; पण थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा खडा किंवा थेंब पडलेल्या जागेला वळसा मारून रांगा धरून त्या चालू लागतात. हा त्यांचा मोठा गुण!

 मुंबईकरांची मागील महिन्यात झालेल्या स्फोटानंतरची वागणूक ही मुंग्यांप्रमाणे होती. वरून आघात झाला, काही वेळ गोंधळल्यासारखे झाले; पण, त्यानंतर लगेचच पुन्हा आपला कार्यक्रम चालू झाला.

 मुंबईकरांच्या या शिस्तीचे आणि धैर्याचे देशभर आणि जगभर मोठे कौतुक झाले. आणि, या कौतुक करणाऱ्यांच्या मनामध्ये एक भावना होती की, अशा तऱ्हेने जर हिंदुस्थानातील नागरिक आतंकवाद्यांच्या कारवायांना तोंड देऊ लागतील तर आतंकवादाचा काहीही परिणाम होणार नाही आणि आतंकवादाविरुद्धची आपली लढाई आपण सहज जिंकू शकू.

 मुंबईकरांच्या या शिस्तबद्ध वागण्यामुळे आतंकवाद्यांचा एक हेतू, जो देशामध्ये जातीय वैमनस्य आणि दंगली माजवणे आहे तो जरी सफल झाला नाही तरीसद्धा आतंकवादाविरुद्ध एक मोठी लढाई जिंकल्यासारखे होईल असे या कौतुक करणाऱ्या महात्म्यांचे म्हणणे!

 मुंबईत राहणारे माझे अनेक नातलग, स्नेही, मित्र आहेत. त्यांच्यापैकी काहींची मी विचारणा केली, त्यांचे कौतुक केले; पण त्यांना त्या कौतुकाने फारसे काही गोंजारल्यासारखे वाटले नाही. उलट, असे कौतुक करणाऱ्यांच्या मनामध्ये काही एक मोठा डाव आहे असेच त्यांचे मत दिसले. "नाही तर आम्ही काय करणार होतो?" त्यांनी विचारले. मुंबईकरांना सकाळी उठून कामावर जाणे आणि संध्याकाळी कामावरून परत येऊन विश्रांती घेणे यापलीकडे आयुष्य माहीत नाही. काहीही विपरीत घडले की पुन्हा एकदा, शक्य तितक्या लवकर, आपल्या 'हापिस गोईंग मुंबई'च्या कार्यक्रमात ते मशगूल होऊन जातात. यात काही फार मोठे शौर्य आहे असे नाही, ही केवळ एक गतानुगतिकता आहे, असे त्यांचे मत दिसले.

 जमिनीवर रांगा धरून चालणाऱ्या मुंग्यांच्या पद्धतीने मुंबईकर शिस्तीने वागले हे खरे; पण, याच मुंग्यांचे एक दुसरे दर्शनसुद्धा आहे. जमिनीवर दिवसाउजेडी त्यांच्यावर हल्ला झाला तर त्या अहिंसेच्या परमभक्त असल्यासारख्या वागतात. हल्ला कोठून आला त्याची चौकशीही करीत नाहीत; ते हल्लेखोरावर प्रतिहल्ला करून प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पण याच मुंग्या, जेव्हा त्यांच्या वारुळामध्ये किंवा बिळामध्ये कोणी बाहेरचा प्राणी शिरतो तेव्हा अगदीच वेगळ्या

भारतासाठी । २८१