पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/279

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या


 ११ जुलै २००६ रोजी मुंबईत एकामागोमाग एक असे सात बाँबस्फोट झाले. सातही बाँबस्फोट पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल गाड्यांमध्ये वेगवेगळ्या स्टेशनांवर झाले. त्याच दिवशी श्रीनगर येथेही एका बाँबस्फोटात अनेक माणसे मरण पावली.
 श्रीनगरच्या रहिवाशांना बिचाऱ्यांना वर्षानुवर्षे बाँबस्फोटांची आणि हल्ल्यांची सवय झाली आहे. त्यांच्या दृष्टीने ११ जुलैचा बाँबस्फोट हा शेकडो बाँबस्फोटांच्या मालिकेतील एक. थोड्याच कालावधीत त्याकडे दुर्लक्ष करून ते आपापल्या कामाला लागले. बाँबस्फोटात ज्यांच्या घरची माणसे जखमी झाली किंवा मरण पावली त्यांच्या नातेवाइकांपुरतेच काय ते दुःखाचे सावट राहिले; बाकीचे सारे श्रीनगर आपल्या नेहमीच्या कामधंद्याला, उद्योगाला लागले.

 मुंबईच्या बाबतीत मात्र बाँबस्फोट हा इतका अंगवळणी पडण्यासारखा प्रकार नाही. १९९३ साली झालेल्या प्रचंड बाँबस्फोटानंतर वर्षादोनवर्षांनी एखादा बाँबस्फोट होत राहिला, पण तो मुंबईतील वेगवेगळ्या जागी. त्यांचा परिणामही स्थानिक. परंतु, १९९३ सालानंतर १३ वर्षांनी पहिल्यांदा सगळ्या मुंबईला व्यापून टाकणारा दहशतवादाचा हा प्रकार घडला.

 स्फोट झाल्याझाल्या त्यात प्रत्यक्षात जखमी न झालेल्या लोकांनी डब्यामध्ये अडकलेल्या, रुळांवर पडलेल्या लोकांना ताबडतोब वाचवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या इमारतींतील नागरिकांनीही अंथरुणे, पांघरुणे, साड्या जे काही हाती लागले ते जखमींच्या मदतीकरिता ताबडतोब देऊ केले. सगळे लोक एकदिलाने कामाला लागले. ज्यांना जखमा झालेल्या नव्हत्या अशा लोकांनाही घरी जाण्याकरिता रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनचालकांनी – छोट्या गाड्या, मोठ्या ट्रक, सर्वांनीच – मदत केली.

भारतासाठी । २७९