पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/277

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विदर्भाचा अनुशेष प्रचंड आहे, पण त्याचा संबंध सरकारी अंदाजपत्रकीय अनुशेषाशी नाही. हा अनुशेष कोणा एका प्रदेशाने विदर्भावर लादलेला नाही. विदर्भ जंगलांनी समृद्ध आहे. साऱ्या देशाला कोळसा, मँगनीज इत्यादी मौल्यवान खनिजे तो पुरवितो. विदर्भाच्या या सगळ्या पांढऱ्या, काळ्या, हिरव्या सोन्याची लूट गोऱ्या इंग्रजांनी केली. स्वातंत्र्यानंतर, समाजवादाच्या नावाखाली काळ्या इंग्रजांनीही ती लूट चालविली. या सर्वच कच्च्या मालाची लूट चालू राहिली. हजारो कोटी रुपयांची दरसाल लूट झाली. विदर्भाचा खरा अनुशेष या लुटीत आहे.

 दिल्लीचे सरकार लुटीचे राजकारण चालवत होते आणि राज्यसरकारही दिल्लीला बांधलेले, विदर्भ मूर्तीमंत, 'भारत' आणि याउलट दिल्लीचे सरकार आणि महाराष्ट्र 'इंडिया'चा, मुंबई महाराष्ट्राची खरी, पण त्यापेक्षा अधिक इंडियाची हे विदर्भाच्या दुःखाचे मुख्य कारण आहे.

 कापूस एकाधिकाराच्या नावाखाली विदर्भातील घरभेद्यांनी शेतकऱ्यांचा बळी देऊन स्वतः कापूस सम्राट, सूतसम्राट बनण्याचा प्रयत्न केला. आपले पांढरे सोने साठवण्याचे, विकण्याचे किंवा त्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य विदर्भाला मिळाले नाही. कोणत्याच पक्षाने ही विदर्भाची कैफियत ऐकली नाही यातच विदर्भाच्या दुःखाचे मर्म आहे.

 रामायणात पुष्पक विमानातून अयोध्येस परत जाताना राम सीतेस, 'हा पहा विदर्भ - बुद्धिवंतांचा प्रदेश', म्हणून सांगतो. प्रतिकालिदास भवभूती येथला, अर्थ गौरवात अजोड असा भारवि येथला, भास्कराचार्य येथले; पण भवभूतीप्रमाणेच, विदर्भाची जनता 'काळ अनंत आहे, पृथ्वी विपुल आहे, आपल्या गुणांची दाद घेणारा कुणी भेटेल' या आशेवर तगून आहे. विदर्भाची सृजनशील संस्कृती मागे पडली. तलवारीवर जगणारेच काय ते वीर अशी भावना झाली. लुटारू कर्तबगार ठरले. समाजवादाच्या रणगाड्यांना थांबवण्याचे धाष्टर्य कोणी करू धजले नाहीत. नेतृत्वाच्या भोवती खोट्या पुढाऱ्यांचे जंगल माजले. सत्तालोभापोटी त्यांनी विदर्भाला वापरून घेतले, लोकांच्या मनातील विदर्भप्रेम किती अथांग आहे याची जाणीव असल्याने त्यांनी त्याचा आपल्या स्वार्थाकरिता लाभ उठवला. आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी विदर्भाची तकलादू कैफियत मांडली. आंदोलनाचा गवगवा केला पण जरा संधी मिळताच 'इंडिया'त सामील होऊन गेले. विदर्भाचे करंटे नेतृत्व हे विदर्भाचे दुसरे मोठे दुःख.

 विदर्भवासीयांना आम्ही आवाहन करतो, विदर्भाच्या निसर्गसंपत्तीला आणि

भारतासाठी । २७७