पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/266

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निघाले. मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती की ज्या अधिकाऱ्याच्या भागातून एकदेखील शेतकरी बडोदा येथे पोचेल त्याची नोंद घेतली जाईल. पोलीस अधिकारी म्हणजे 'आधीच मर्कट', त्यात अशी दारु पाजलेली. दंगलीत मुसलमानांविरुद्ध शस्त्र उचलताना प्रतिकार होण्याची मनात काहीतरी धास्ती होती. इथे तर फक्त 'धोतरे' खेडूत. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या गाड्या जागोजागी अडवल्या आणि त्यांना अक्षरशः गुरासारखे बडवून काढले. मारण्याच्या श्रमाने एक पोलिस इन्स्पेक्टर छातीत कळ येऊन पडला आणि नंतर दुर्दैवाने इस्पितळात त्याचा देहांत झाला. हा इन्स्पेक्टर शेतकऱ्यांच्या दगडफेकीत मेला असा मुख्यमंत्र्यांनी सर्व माध्यमातून प्रचार केला आणि मग पोलिसांनी ज्या तहेने लाठीहल्ला केला त्याच्या दृश्यफिती उपलब्ध असूनही उघड्या डोळ्यांनी पाहणे सहृदयी माणसाला शक्य होत नाही.

 मानवी हक्क आयोगाकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली. 'बेस्ट बेकरी' प्रकरणात प्रसिद्धीचा आणि मोठेपणा मिळण्याचा मोका होता तसा येथे नसल्याने मानवी हक्क आयोगानेही दाद घेतली नसावी. या चित्रफितींचा उपयोग परदेशी वृत्तपत्रे व बीबीसीसारख्या वाहिन्या यांच्यामार्फत करण्याचा प्रयत्न चालू आहे.

 उपोद्घात

 गुजरात आंदोलनाहून मी आलो, आंदोलनाच्या अनुभवांची उजळणी मनात झाली ती संघटकच्या सगळ्या वाचकांना कळावी असे वाटले. सगळ्याचा सारांश असा - क्रांतीकाळातही क्रांतीकारी बेशिस्त करतात. ज्यांची सारी जीवनशैलीतच बेशिस्त झालेली असते अशी माणसे क्रांतीच्या चैतन्यकणाच्या अनुभवाने मरायला तयार होतात, मारायला नाहीत. पूर्वेतिहासातील भुते उकरून मंदिर, मंडल मार्गाने थातुरमातुर आक्रमकता तयार करता येते; पण, तिचा उपयोग बलशाली प्रतिस्पर्ध्यासमोर होत नाही, शेतकऱ्यांसारख्या अजापुत्रांवरच होतो. नरेंद्र मोदींनी सारी जमवाजमवी करून मुसलमान समाजाविरुद्ध केवळ सरावासाठी अत्याचार केले, हिंदुत्ववाद्यांच्या अत्याचारशक्तीचा खरा बळी भारतभरचा शेतकरीच ठरणार!

(२१ ऑगस्ट २००३)

◆◆

भारतासाठी । २६६