पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/265

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांना यश येऊ लागले.
 बेस्ट बेकरीत कोलीत पेटले -
 अलीकडच्या वर्षात या हिंदुवीरांचे परमदैवत म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. गोध्रा स्टेशनवरच्या जाळपोळीत काही अयोध्या कारसेवक जळून मेले. प्रत्यक्षात काय घडले ते कधी शाबीत झालेच नाही, पण हे सर्व मुसलमान गुंडांनी घडवून आणले असे वातावरण तयार करून, महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी यांनी गोडसेवादाचा परमोच्च विजय करून दाखवला. गुजरातभर योजनापूर्वक दंगली घडवून आणल्या, हजारो निरपराध मुसलमानांना मारवले, पोलीसांनी नि:पक्षपातीपणाचे सोंगसुद्धा आणले नाही. फार थोड्या दंगेखोरांना अटक झाली. साक्षीदारांना दमदाटी करून त्यांना फितवण्यात आले आणि साऱ्या हिंदू गुंडाची मुक्तता करण्यात आली. सुदैवाने, 'मानवाधिकार आयोगाने' लक्ष घातल्याने निदान, 'बेस्ट बेकरी' खटला व इतर दोनचार प्रकरणांची सुनावणी गुजरात राज्याबाहेर होण्याचे ठरते आहे. खोट्या इतिहासाची भुते उभी करून नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभेत प्रचंड बहुमत मिळविले, त्यामुळे मुसलमानांवर रुबाब दाखवण्याची त्यांची इच्छा काही पुरी होताना दिसत नाही. नरेंद्र मोदींनी उभी केलेली ही राक्षसी ताकद कोसळली ती शेतकऱ्यांच्या डोक्यावर.
 - कोलीत शेतकऱ्याला जाळीत सुटले

 विजेच्या दरात २५० ते ३०० टक्के वाढ करण्यात आली. त्याचे काही निरर्गल समर्थन एका 'चोपड्या'त मुख्यमंत्र्यांनी केले; आपले सरकार शेतकऱ्यांकरिता काय काय भल्या गोष्टी करते आहे याची जंत्री मांडली आणि विजेच्या अर्थकारणात सगळा दोष पूर्वीच्या काँग्रेस शासनाचा आहे असा कांगावा केला. आपल्याच सरकारने नर्मदेचे पाणी गुजरातभर आणून दिले अशी शेखी या चोपडीत मारली आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आठवत असेल की 'बायपास टनेल' खणून मुख्य कालव्याने पाणी साबरमतीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव खेडूत समाजाने मांडला होता; त्यासाठी कारसेवेचे आंदोलन केले होते; हिंदुस्थानभरातून हजारो शेतकरी त्यासाठी गोळा झाले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरूनच केशूभाई पटेलांनी शेतकऱ्यांवर पोलिसी दडपशाहीचा वरवंटा फिरवला होता आणि आज जणू ही योजना आपलीच होती अशी शेखी गोबेल्सच्या पद्धतीने नरेंद्र मोदी मिरवीत आहेत.
 १४ ऑगस्ट २००३ रोजी बडोद्यात नियोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला हजर राहण्यासाठी गुजरातच्या सर्व जिल्ह्यातून लाखो शेतकरी गावागावातून

भारतासाठी । २६५