पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/263

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अर्थवादी चळवळीत काव्यात्मकता नसते त्यामुळे वेडेपीर पोसण्याची अशा आंदोलनांची क्षमता कमी असते. याउलट, दररोजच्या जीवनातील आर्थिक, सामाजिक वास्तविकतेला दूर ठेवून जात, धर्म, राष्ट्र अशा अप्रस्तुत मुद्द्यांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या संघटना व पक्ष लोकांच्या मनाला अधिक भावतात. 'वर्तमानकाळात प्रतिष्ठेने, स्वाभिमाने, सन्मानाने जगण्यासारखे काहीच राहिले नाही' म्हणत माणसाची भूतकाळात जाऊन इतिहासातली अभिमानस्थळे शोधून काढण्याची प्रवृत्ती होते. कालाच्या सुरवातीपासून ते इतिहासाच्या अंतापर्यंत, ना भूतकाळात ना भविष्यकाळात - अभिमान बाळगण्यासारखे काही नाही ही भावना मनुष्याला सोसणारी नाही. ज्यांना अभिमान बाळगण्यासारखे काही नाही असे लोकही काही मिथ्यके तयार करून अभिमानस्थळे उभी करतात. 'नर्मदामय्याने आदेश दिला म्हणून आम्ही परिक्रमावासियांना लुंगवतो' असे शूलपाणीश्वरच्या झाडीतील भिल्ल म्हणतात. 'सीतामाईच्या आदेशाप्रमाणे आम्ही लूटमारी करतो' असे रामोशी मानतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे विवेकी प्रतिभावंतही, '१८५७ चे स्वातंत्र्यसमर हे प्रत्यक्षात केवळ चपात्यांचे बंड असले तरी ते स्वातंत्र्यसमर होते असे सिद्ध करणे आवश्यक आहे' असे आग्रहाने मांडतात.

 माझ्या पोटात भूक आहे, माझी पोरं उपाशी आहेत या जाणीवेतून माणसे पराक्रमाला तयार होत नाहीत. बंगालच्या दुष्काळात हजारो माणसे धान्याच्या कोठारांच्या दरवाजासमोर भुकेने तडफडत मेली, पण कोणी दरवाजा फोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.

 मी हाती शस्त्र घेतो आहे, ते भुकेपोटी नाही तर पूर्वजांच्या प्रतिष्ठेसाठी, धर्माच्या निष्ठेपोटी, जातीच्या अभिमानासाठी ईश्वराच्या आदेशाप्रमाणे घेत आहे. अशा भावनेने माणसे मरायला तर तयार होतातच, पण मारायलाही तयार होतात.

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाउंटनच्या रणसंग्रमात बादल्या भरून पाणी कुणी आणले? पोलीसांवर दगडफेक कुणी केली, दुकाने कुणी लुटली? हे काही सर्वसामान्य नीटपंथे चालणाऱ्या लोकांच्या हातून होणारे नाही. अशा गोष्टी ते पोटात भूक आहे म्हणून करणार नाहीत, एवढेच नाही तर जाती, देव, धर्म, राष्ट्र यांच्या आवाहनापोटी करणार नाहीत. धोपटमार्गी अशा आवाहनांपोटी मरायला तयार होतील, मारायला तयार होणार नाहीत आणि मारायला तयार झाले तरी ती ऊर्मी प्रबळ शक्तींपुढे टिकणार नाही; फार तर, आपल्यापेक्षा कमजोर दुर्बलांविरुद्ध त्यांचा पुरुषार्थ दिसू शकेल.

 फ्लोरा फाऊंटनची क्रांतीकारी बेशिस्त दाखवणारे कोण? ज्यांच्या आयुष्यात

भारतासाठी । २६३