पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/259

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धापसुद्धा शांत झाली नव्हती. धड श्वास घेता येत नाही, धड बोलता येत नाही अशा अवस्थेत सारे तरुण मला एकच सांगत होते, "आता आम्हाला पुन्हा पोलीसासमोर मोकळ्या हाताने जायला सांगू नका. पुढच्यावेळी समसमानांचा सामना होऊ द्या. त्यांच्या हाती काठी तर आमच्याही हाती काठी असू द्या; मग जे व्हायचे ते होऊ द्या. लाठी चालवता चालवता डोके फुटले तरी बेहत्तर, पण 'समोरच्याच्या हाती लाठी आणि आमच्याकडे फक्त पाठी' या परिस्थितीत एक हताशपणाची स्त्रैण जाणीव होते ती लाठीच्या मारापेक्षाही भयानक असते."

 हातापायांवर, पाठीवर बसलेल्या लाठीच्या माराचे वळ अजून टरटरून वर येत आहेत अशांना ब्रह्मज्ञान सांगण्यात काही अर्थ नव्हता, हाती नुसती काठी घेण्याची परवानगी देऊन भागणार नाही, ती चालवण्याचे, मार अडवण्याचे आणि वर्मी घाव घालण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण द्यावे लागते हे त्यावेळी त्यांना पटले नसते.

 सामना सशस्त्र शासनाशी आहे. शेतकरी लाठी घेऊन बाहेर पडले तर पोलीस बंदुक घेऊन बाहेर येतील; शेतकरी बंदुका घेऊन बाहेर पडले तर पोलीस मशीनगन्स घेऊन येतील, हंगेरी, पोलंड येथे घडले तसे रणगाडे घेऊन येतील, तोफा डागतील. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध कोसळून पडले ते गावोगावच्या वेशीजवळील झाडांवर टांगून फाशी दिलेल्या हजारो वीरांच्या लटकत्या शरीरांच्या दृश्याने. 'शस्त्रांची स्पर्धा वाढवून जनआंदोलने प्रभावी होत नाहीत, यासाठी शत्रूच्या मनातील द्वेषभावना संपवावी लागेल, त्यासाठी आपल्या मनातही लवमात्रही हिंसा-विद्वेषाची भावना असता कामा नये' असा काहीसा विचित्र मंत्र महात्मा गांधींनी दिला होता.

 इंग्रजांनी, अगदी नाईलाज झाला तेव्हाच, हिंदुस्थान सोडला. सोडता सोडता देशाची शकले केली, जातीय विद्वेषाचा आगडोंब भडकावून दिला आणि प्रत्यक्ष धुमश्चक्रीत पोसल्या जाणाऱ्या पौरुषी गुणांऐवजी बुळचट कायरतेलाच सद्गुण मानणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता सोपवून इंग्रज गेले. हा काही फार मोठा विजय नाही पण नि:शस्त्र, असंघटित, दरिद्री, निरक्षर, कोट्यवधी जनतेला उभे करण्याचा युद्धशास्त्रातला तो एक मोठा प्रयोग होता यात काही शंका नाही.

 गेल्या पंचवीस वर्षांच्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या कालखंडात अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मला हिणवले आहे, 'शरद जोशी आम्हाला शांत बसायला लावतात त्यामुळे आंदोलन प्रभावी होत नाही, शरद जोशी हा शेतकरी आंदोलनाला मोठा अडथळा झाला आहे, अन्यथा आम्ही तरुणांनी काय चमत्कार करून

भारतासाठी । २५९