Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/254

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हिमतीचे झाड उगवते कसे?


 'साधु लोकांचा छळ होऊ लागला की दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी प्रत्यक्ष मी अवतार घेतो' असे श्रीकृष्णाचे भगवद्गीतेतील वचन आहे.

 समूहाची शक्ती

 खल दैत्य माजले आणि सरळधोपट संसार-प्रपंच करणाऱ्यांना जगणे अशक्य झाले की सामान्यांच्या अश्रूंतून, आक्रोशातून आणि वेदनांतून एक सामूहिक शक्ती उभी राहते आणि तिचे तांडवनृत्य चालू झाले की, ते दुष्टांचे पारिपत्य करूनच थांबते. भगवद्गीतेच्या संदर्भाखेरीजही या सनातन सत्याचा अनुभव वारंवार येतो.

 सामूहिक उद्रेकाची शक्ती उभी राहिली म्हणजे मोठे मोठे चमत्कार घडू लागतात. एकमेकांना पूर्वी कधीही न भेटलेले लाखालाखांचा जमाव जणू काही सगळा कार्यक्रम पूर्वनियोजित असावा किंवा त्या कार्यक्रमाच्या वारंवार रंगीत तालमीही झाल्या असाव्यात अशा तऱ्हेने एका सांघिक जाणीवेने काम करू लागतो.

 संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दाखला

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फ्लोरा फाऊंटनवर शंभरावर तरुण हुतात्मा झाले, त्या प्रसंगी मी हजर होतो. पोलिसांनी अश्रुधूर सोडला, आता लोक काय करणार असा मी अचंबा करत होतो. तेवढ्यातच, आश्चर्याने पहात राहिलो. अनेकांनी पाण्याने भरलेल्या बादल्या, तांबे, छोटी मोठी भांडी भराभरा आणायला सुरुवात केली. एवढ्या भाऊगर्दीत त्यांना ही सारी सामग्री मिळाली तरी कोठे आणि कशी? अश्रुधुराला तोंड देण्याकरिता पाण्याने चिंब भिजलेली फडकी, रुमाल तोंडावर धरले म्हणजे अश्रुधुराचा फारसा त्रास होत नाही हे यांना सांगितले तरी कुणी, कळले तरी कसे आणि त्यांनी इतक्या तातडीने अंमलात आणले

भारतासाठी । २५४