पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/251

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरीविरोधी किंमत धोरणांचा हेतुपुरःसर दुष्टावा तोवर मला यथार्थपणे जाणवला नव्हता. एकदा माझ्या शेतावर पूर्वी काम करणारा एक तरुण मला भेटायला आला. माझ्या शेतावर काम करीत असताना त्याला त्या वेळच्या किमान वेतन दराप्रमाणे दिवसाला ३ रुपये रोज मिळत असे; इतरत्र त्याहूनही कमी. काहीतरी लटपटी खटपटी करून त्याने जवळच्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्ये जपानी सहयोगाच्या दाई-ईची नावाच्या कारखान्यात नोकरी मिळविली. पहिल्या महिन्याचा पगार हाती पडताच तो मला भेटायला आला होता. डोळे आसवांनी डबडबलेले. म्हणाला, "मला इथं शेतावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत कष्ट करावे लागत, घोटभर पाणी पिण्यालाही फुरसत होत नसे. तेव्हा कुठे दिवसाकाठी ३ तुकडे मिळायचे. तिकडे कारखान्यावर आम्ही कामगार सारा वेळ मशीनच्या मागे उभे राहून आरामात विड्या फुकत असतो आणि महिनाअखेरी आम्हाला इथे मिळत होते त्याच्या दसपट पगार मिळतो. हा काय चमत्कार आहे?"

 त्याच सुमारास, माझ्या शेतावर काम करणारांसाठी मी रात्रीचा साक्षरता वर्ग चालवीत असे त्यात नव्याने आलेली एक छोटी मुलगी मांडीवर पाटी घेऊन अत्यंत गंभीरतेने, शांत मुद्रेने आणि तन्मयतेने, मी फळ्यावर काढलेली अक्षरे काढण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्याला माझ्या मुली शिकत असलेल्या शाळेच्या समारंभाला हजर रहावे लागले. तिथलं सारंच वातावरण मौजमजेचं होतं. फुगे, झिरमिळ्या, खेळ, स्टॉल्स, खाद्यपदार्थ, बँड, फटाके आणि काय काय होते! तेथील उत्साहाला सीमा नव्हती. लहान लहान मुलेमुली रुपयाच्या नोटा रद्दी कागदाच्या कपट्यांप्रमाणे उधळीत होते.

 संभ्रमित अवस्थेत मी माझ्याच मनाला विचारू लागलो की, "स्वित्झर्लंडहून मी कोणत्या हिंदुस्थानात परत आलो आहे? जेथे एक लहानशी मुलगी अपुऱ्या प्रकाशात शेती सामानाने भरलेल्या अस्वच्छ खोलीमध्ये बसून आयुष्यात प्रथमच पाटीवर काही अक्षरे उमटवण्याचा प्रयत्न करते आहे त्या आंबेठाणसारख्या गावांच्या हिंदुस्थानात का इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलने आयोजित केलेल्या समारंभाच्या हिंदुस्थानात?"

 त्याच क्षणी माझ्या डोक्यात विचार चमकून गेला की एका बाजूला आंबेठाण आणि त्यासारखी खेडी आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवड तसेच पुणे यांसारखे भाग ही दोन वेगळीच जगे आहेत. त्यांच्यात कुठेच साधर्म्य नाही. शहरातील शाळेच्या समारंभात पैशाची जी नाहक उधळपट्टी होते त्याच्या अल्पांशानेही रक्कम खेड्यातल्या शाळेमध्ये फळा बसवण्यासाठी उपलब्ध होत नाही. माझ्या मनाची

भारतासाठी । २५१