पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/246

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊ शकतो अशी एक विकृत बुद्धी तयार झाली.

 खुलेपणाने उत्पादन वाढते, रोजगार वाढतो पण त्याची फळे कोणाच्या पदरी पडतात? उत्पादनाच्या प्रत्येक साधनाला त्या त्या साधनाच्या मागणी-पुरवठ्याच्या परिस्थितीप्रमाणे किंमत मिळते. मागणी पुरवठ्यावर आधारलेली किंमत योग्य नाही, त्यात आपल्या उत्पादनातील सहभागाचा यथायोग्य मोबदला मिळत नाही अशी काहीजणांची तक्रार असणारच. मागणीपुरवठ्यावर आधारलेल्या व्यवस्थेत दीनदुबळ्यांच्या संरक्षणाची काही व्यवस्था कागदोपत्रीतरी नसते. त्यामुळे, साऱ्या समाजाचा उत्कर्ष झाला तरी दीनदुबळ्यांना मनुष्यप्राणी म्हणून ज्या जीवनमानावर अधिकार सांगता आला पाहिजे ते मिळण्याची काहीच औपचारिक व्यवस्था नसते. या कारणाने, कदाचित्, स्वातंत्र्य आणि न्याय यांमध्ये काही संघर्ष आहे अशी कल्पना होऊ शकते.

 प्रत्यक्षात, नियोजनव्यवस्थेत ज्यांचे शोषण झाले ते शेतकरी, बलुतेदार समाज खुल्या व्यवस्थेत आपल्यावर अन्याय होतो असे फार कडवेपणाने मांडत नाहीत. नियोजनाच्या व्यवस्थेत आपल्या संघटित शक्तीचा उपयोग करून घेऊन ज्यांनी आपले पगार, भत्ते, सोयीसवलती, नोकरीतील सुरक्षितता आणि निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळवून घेतला त्यांना आता आपल्याला आजन्म सुरक्षिततेची शाश्वती रहाणार नाही, आपल्याला काही काम करावे लागेल, ग्रहकाची मर्जी संपादन करावी लागेल, तो नाराज झाल्यास बेकारीची कुऱ्हाड आपल्यावर कोसळू शकते ही दहशत वाटते. वर्षानुवर्षे उपभोगलेले अपात्र भाग्य हातातून निसटून जाते आहे असे म्हटल्यावर हा वर्ग स्वातंत्र्यामुळे होणाऱ्या अन्यायाविषयी हाकाटी करताना दिसतो.

 युक्तिवादासाठी, स्वतंत्र व्यवस्थेत दीनदुबळ्यांच्या संरक्षणाची काही व्यवस्था नाही असे मानले तरी पर्यायी नियोजनाच्या व्यवस्थेत गोरगरीबांची काय सोय झाली, त्यांची कोणती गरीबी दूर झाली आणि त्यांचे कोणते भाग्य फळफळले हे पाहू गेले तर निघणारा निष्कर्ष स्पष्ट आहे. अब्जावधी रुपये दारिद्र्यनिर्मूलन व सामाजिक न्याय यांसाठी खर्च झाले; त्यांतले गरीबांपर्यंत फार थोडे पोहोचले; त्याने पुष्ट झाली ती नोकरशाही यंत्रणा. खुल्या व्यवस्थेत दीनदुबळ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था नाही याचा आक्रोश गरीबांपेक्षा नोकरमाने अधिक आकांताने का करतात याचे रहस्य यातून उघड होते.

 स्वतंत्र व्यवस्थेत न्याय नाही ही कैफियत गोरगरीबांची नाही, त्यांच्या नावाने दांडगे झालेल्या नोकरशहा आणि भ्रष्टाचारी नेते यांची आहे हे विदारक सत्य

भारतासाठी । २४६