पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/245

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अन्यथा, समन्वयाचा किंवा संतुलनाचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी पंडित स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या संतुलनाविषयी बोलला की निदान त्याच्या मनात स्वातंत्र्य आणि न्याय या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत असे धरलेले असते. स्वातंत्र्य दिले की अन्याय होणारच आणि न्याय हवा असेल तर कोण्या न्यायबुद्धी शासकाने हस्तक्षेप केला पाहिजे अशीही त्याच्या मनातली खूणगाठ असते. या समजुतीचा उगम माणसाच्या बुद्धिव्यवस्थेतच असावा. घर आहे त्याअर्थी घर बांधणारा कोणीतरी असला पाहिजे; मोटरगाडी आहे त्याअर्थी ती तयार करणारा कोणी कारागीर, कारखानदार असला पाहिजे ही सांत अनुभवातून उपजलेली कार्यकारणबुद्धी माणसाच्या मानगुटीवरून उतरत नाही. ज्याअर्थी सृष्टी आहे त्याअर्थी त्या सृष्टीचा कोणी कर्ता असला पाहिजे अशी त्याची सहज खात्री होते. भोवतालच्या साऱ्या निसर्गाचे उत्पत्ती, स्थिती, विकास आणि लय स्वयंभूपणे सातत्याने चालले आहेत हे दिसत असूनही तो कर्त्याच्या शोधात युगानुयुगे फिरत आहे. हा गोंधळ, कदाचित्, व्याकरण व्यवस्थेतूनही येत असेल. कर्ता, कर्म, क्रियापद ही वाक्यरचनेची व्यवस्था आमच्या मनात इतकी ठसली आहे की कर्मणी प्रयोगातही अध्याहृत कर्ता आम्ही गृहीत धरतो.

 कोणत्याही कारणाने का होईना, स्वातंत्र्य दिले की बेतालपणा येणार, दुरवस्था माजणार हा पूर्वग्रह, कदाचित्, पदार्थविज्ञानशास्त्रातील (एस्ट्रॉपी) सिद्धांतास अनुसरून असेल. जड विश्वाला लागू असलेला हा सिद्धांत सजीव समाजांना लावण्याचे काहीही समर्थन होऊ शकत नाही आणि तरीही, मोकळीक मिळाली की त्याचा गैरफायदा घेतला जाणार आणि अन्याय, अनीती माजणार अशी कल्पना अनेकांच्या मनात घर करून बसलेली आहे.

 साऱ्या सृष्टीचा विकास खुलपेणाच्या आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांनी चाललेला डोळ्यांना दिसत असतानाही ही धारणा कायम आहे.

 केंद्रीभूत नियोजनाचा जागतिक पातळीवर फज्जा उडाला आणि स्वतंत्रतेवर आधारित खुल्या अर्थव्यवस्था भरभराटत गेल्या या अनुभवानेही ही विचित्र धारणा बदलली नाही. अनियंत्रित खुलेपणाच्या व्यवस्थेत शिस्त असणारा अदृश्य हात कोण याची चर्चा ॲडम स्मिथपासून ते हायेकपर्यंत अनेकांनी केली. नियोजन नाशाकडे नेते आणि खुलेपणाने समाज वैभवाकडे जातात. मानवजातीची प्रगती म्हणून जी झाली ती फक्त स्वतंत्र व्यवस्थेतच झाली. जेथे जेथे स्वातंत्र्याला बाधा आणून धार्मिकांनी वा समाजसत्तावाद्यांनी हस्तक्षेप केला तेथे तेथे त्याचा विपरीतच परिणाम झाला हे ऐतिहासिक सत्य समोर असूनही कृत्रिम हस्तक्षेपानेच न्याय

भारतासाठी । २४५