पैगंबर प्रेषितांनी चिंतन, मनन करून, कठोर तपस्या करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेली उत्तरे त्या काळची परिस्थिती पाहता खरोखर अद्भूत वाटतात. आज याच प्रश्रांची उत्तरे लक्षावधी शास्त्रज्ञ अंतराळात दूरवर दृष्टी लावन आणि पदार्थमात्रांच्या खोल खोल आत शिरून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विश्वाचे रहस्य सोडवण्याकरिता आणि समजण्याकरिता आपण कुणाचे बोट धरून चालणार? ऋषिमुनी आमचे पूर्वज होते म्हणून त्यांनी सांगितले ते मानणार काय? त्यांना मानले तर आपण खरा 'स्वधर्म' बुडवला असे होईल आणि भूतकाळातल्या एका जुन्यापुराण्या धर्माचे पालन केले असे होईल. धर्माने विश्वाची उत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याआधारे समाजातील मनुष्यमात्रांना त्यांच्या दैनंदिन वागण्यासंबंधी काही नियम घालून दिले. हे नियम त्या त्या काळात, त्या त्या समाजपरिस्थितीत योग्य असतीलही, पण म्हणून आजही ते योग्य आहेत असे पक्के धरून चालणे मोठे धोक्याचे आहे.
उदाहरणार्थ, एका काळी कदाचित काही समर्थन असलेली वर्ण आणि जाती व्यवस्था आजही आग्रहाने मानायची म्हटली तर अशा धर्मपालनाने तारण होणार नाही, मरण येईल.
'स्वधर्म' या शब्दातील 'स्व' हे अक्षर महत्त्वाचे आहे. ज्याचा अभिमान धरावा आणि ज्यासाठी प्रसंगी प्राण ठेवण्यास तयार व्हावे असा तो स्वधर्म कोणता हे समजणे अति परिश्रमाचे काम आहे. ऐयागैयाला एवढे काबाडकष्ट व्हायचे नाहीत. त्यांच्या सोयीकरिता काही धर्मांच्या घाऊक वखारी टाकल्या आहेत. त्यातील कोणतीही एक वखार ते स्वीकारू शकतात. प्रत्यक्षात, वाडवडिलांच्या परंपरेने ज्या वखारीचे गिहाईकपण चालून आले तेथलीच गिहायकी कायम ठेवली जाते.
मी ज्या वर्षी आंबेठाणला आलो त्या वर्षी गावात एका लग्नाच्या जेवणानंतर शेकडो लोकांना विषबाधा झाली. शिजवलेल्या भातात काही दोष होते एवढे सिद्ध झाले, पण तांदुळात तर काही दोष दिसेना. प्रयोगशाळेत शेवटी ठरले की तांदूळ शिजविल्यानंतर भात गरम आणि ताजा वाढला असता तर काही दोष झाला नसता. दोष झाला तो भात शिजवून साठवल्यामुळे. जेवणावळ मोठी असल्यामुळे कढया कढया भात शिजवून शिजलेल्या भाताचा ढीग घालत होते. या ढिगातच भातावर काही बुरशीसारखी वाढ झाली. नेहमीच्या चांगल्या तांदळात असा दोष येत नाही. जेवणावळीकरिता स्वस्तात आणलेल्या तांदळात हा दोष होता.