पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


गुजरातचा कायाकल्प गुजरातलाच करू द्या


 गुजरातमधील भूकंपाने सारा देश हादरून गेला आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या लढाईत किंवा दुष्काळात हजारोंनी माणसे मृत्यु पावतात, जखमी होतात पण एका दिवशी एका क्षणापर्यंत नित्यनेमाप्रमाणे जीवनव्यवहार चालवणारी माणसं एका क्षणातच मरून जातात ही कल्पनाच मोठी भयानक आहे. याप्रसंगी आपणही काही केले पाहिजे अशी भावना गुजरातेतील आणि गुजरातबाहेरील सर्व नागरिकांच्या मनात तेवत आहे. सरकार अधिकृत घोषणा करो ना करो ही राष्ट्रीय आपत्ती आहे, केवळ गुजरात, भूज आणि अहमदाबाद यांच्यावर कोसळलेले संकट नाही असे सर्वांनाच वाटते. चीनचे आक्रमण झाले त्यावेळी जसे उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक मदतीला तयार झाले तसेच याहीवेळी मदतीसाठी लागणारी सर्व सामग्री, कपडे, पांघरुणे, खाद्यपदार्थ, पाणी, दूध, औषधे यांचा महापूर गुजरातकडे लोटत आहे. मृत्युचे असे अकांडतांडव भारतीयांनी पूर्वी कधी पाहिलेले नाही. नैसर्गिक आपत्तीत मदतीची व्यवस्था करण्याची जबाबदारी शेती मंत्रालयाची आहे. या मंत्रालयातील नियंत्रण कक्षाचे एक अधिकारी भूकंप उद्ध्वस्त प्रदेशाला भेट देऊन आले. 'मला जन्मात पुन्हा कधी शांत झोप येईल असे वाटत नाही' अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

 पंतप्रधान झाले तरी शेवटी माणूसच आहे. एक सारे राज्य असे उद्ध्वस्त झालेले डोळ्याने पाहिल्यावर हातचे काही राखून न ठेवता जे काही शक्य असेल ते झालेच पाहिजे असे कोणाही सहृदय माणसाप्रमाणे त्यांनाही वाटले. स्वतःच्या निधीतून ५०० कोटीची रक्कम त्यांनी मदत म्हणून जाहीर करून टाकली आणि वर मदत आणि पुनर्रचना यासाठी प्रचंड साधनसामुग्री उभी करावी लागेल त्याचा खर्चाचा बोजा सर्व नागरिकांना पेलावा लागेल. तस्मात् येत्या अंदाजपत्रकात यापोटी करवाढ करावी लागेल, त्यासाठी देशाने तयार रहावे असा इशाराही

भारतासाठी । २२७