"बाौद्ध किंवा हरिजन समाज तसेच मुसलमान हेही भारतीय जनता पक्ष, शिवसेनेप्रमाणे अत्यंत कडवे जातीयवादी आहेत आणि ते जातीयतेच्या आधारावर हिंदुधर्मियांवर आक्रमक दृष्टीने प्रचार करतात, 'हिंदू को मिटा डालो, बौद्ध धर्म लाओ' असे नारे लावत हिंदुधर्मियांच्या मोहल्ल्यांतून मिरवणुका काढतात तेव्हा शेतकरी संघटना कोणतेही आंदोलन उभं करीत नाही; आपल्या धार्माबद्दल बौद्ध किंवा मुसलमान अभिमान बाळगतात तेवढाच अभिमान हिंदूंनीही आपल्या धर्माबद्दल बाळगला तर त्यात हिंदूंचे काय चुकले?" अशा शंका विचारणारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची पत्रे संघटनेने जातीयवादाविरुद्ध घेतलेल्या ठाम भूमिकेच्या अनुषंगाने आली आहेत. या शंकांचे सामूहिक निरसन करण्याचा हा प्रयत्न आहे.
स्वधर्माविषयी अभिमान बाळगणे हे आवश्यक आहे; जो स्वधर्माविषयी अभिमान बाळगत नाही त्याचा विनाश अटळ आहे.
माझा धर्म कोणता? मी कोणत्या धर्माचा अभिमान बाळगायचा?
"धारयति इति धर्मः।" म्हणजे, संगोपन करतो तो धर्म अशी व्याख्या धर्ममार्तंडच अनेक वेळा देतात आणि अशा धर्माचे रक्षण केले तर तो धर्म आपले रक्षण करतो- “धर्मो रक्षति रक्षितः।" असेही आग्रहाने सांगतात.
पण, "धारयति इति धर्मः।" असे वचन आहे, "अधारयत् इति धर्मः।" असे नाही. म्हणजे, संगोपन करतो तो धर्म असे वचन आहे, ज्याने कधीकाळी भूतकाळात संगोपन केले तो धर्म असे वचन नाही.
एके काळी जे चांगले असेल तेच आजही चांगले असेल असे थोडेच आहे?
या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे चलनवलन कसे चालते आणि या सगळ्या व्यापाचा अर्थ काय या प्रश्नांची उत्तरे एका काळी ऋषिमुनींनी, साधुसंतांनी,