पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/214

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकरण्याइतकासुद्धा वाव द्यायला आम्ही तयार नाही. ते आधी निघून जाऊ द्या आणि ते निघून गेल्यानंतर आमच्यात जे काही दोष आहेत असं म्हटलं जातं - सतिप्रथा, विधवांचे केशवपन, अस्पृश्यांना मंदिरप्रवेशास बंदी, दलितांना शिक्षणाचा अधिकार नाही वगैरे - ते दूर करण्यासंबंधी आमचं आम्ही बघून घेऊ." अशी ही 'राष्ट्रीय' गटाची प्रतिक्रिया होती.
 हिंदुस्थानावर जेव्हा मुसलमानांची स्वारी झाली तेव्हा हिंदुस्थानातल्या रयतेने, बहुजन समाजाने, शूद्रातिशूद्रांनी 'महंमदाच्या जवाँमर्द' शिष्याचं स्वागत केलं; बहुजन समाजाला, शूद्रांना लुटणाऱ्या स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या किल्ल्यावर अल्लाउद्दिनच्या स्वाऱ्या झाल्या, देवगिरीचा किल्ला पाच वेळा पडला. इतिहासकार बेमालूमपणे सांगतात की, देवगिरीचे सैनिक मोठ्या शूरपणे लढले; पण शत्रूसेन्याचं संख्याबळ फार मोठं होतं. म्हणून देवगिरीचा पराभव झाला. असंच चितोडबद्दलही लिहितात. काय आश्चर्य? आपला राजा, स्थानिक, आपल्या धर्माचा आणि दिल्लीहून येणाऱ्या परधर्मी दुष्टकर्मा सुलतानांच्या सैन्याचे संख्याबळ 'आमच्यापेक्षा जास्त कसं काय होते? इतिहासामध्ये काही कोडी असतात तसं हे हिंदुस्थानच्या इतिहासातील एक कोडं आहे. त्या कोड्याचं उत्तर सरळ आहे - बहुजन समाजाला बाहेरून येणारे परके वाटत नव्हते. आपल्याला बरोबर घेऊन मशिदीमध्ये प्रार्थनेला बसणारी, रेटीबेटी व्यवहार करायचे म्हटले तर चालणारी अशी माणसं एका बाजूला आणि इथं राज्य करणारे राजे आणि वतनदार, देशमुख किंवा तत्सम दुसऱ्या बाजूला जुने देशी राज्यकर्ते दरवर्षी फक्त रयतेला लुटायेचे काम करायचे; बरोबरीला कधी घेतच नव्हते - ना सामाजिक संबंधात ना धार्मीक. त्यामुळे बहुजन समाजाची सहानुभूती देशी राजांना कधीच नव्हती. हे म्हणण्याची हिम्मत साऱ्या हिंदुस्थानात फक्त जोतिबा फुल्यांनी दाखविली; आजही असं म्हणण्याची कोणाची हिम्मत होत नाही. पानिपतची तिसरी लढाई झाली. त्याबद्दल अब्दालीच्या दफ्तरात वर्णन आहे की, लढाईच्या वेळी बाजूच्या शेतांमध्ये शेतकरी उभे राहिले आणि त्यांनी असा विचार केला की, अब्दाली जिंकला तर बरे होईल, तो लुटालुट करतो हे खरे, पण मराठे अंगावरचे कपडेही काढून नेतात. तेव्हा अशा लढाईच्या वेळी आसपासच्या बहुजन समाजाची काय भूमिका होती हे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. कारण, मी जो काही 'इंडिया' विरुद्ध 'भारत' किंवा स्वदेशी आणि 'स्वतंत्र' यांच्यातील भेद स्पष्ट करणार आहे तो समजण्यासाठी ही जाण आवश्यक आहे.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक, भारतीय जनता पार्टीचे लोक आपल्याला

भारतासाठी । २१४