पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/210

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे तेव्हा, स्वदेशीच्या या तिसऱ्या लढाईतला महत्त्वाचा आणि गंमतीचा भाग म्हणजे या लढाईत या पक्षातील कोण आणि त्या पक्षातील कोण हे सांगणं कठीण आहे. शेतकरी संघटना ही एकटीच तत्त्वाला धरून राहणारी ठरली. ज्यावेळी रशियाचा समाजवाद आणि नेहरूंचा समाजवाद याला पर्याय नाही असं म्हटलं जायचं त्या वेळेपासून समाजवादाचा विनाश अटळ आहे हे ठामपणे संघटना मांडत आलेली आहे आणि अजूनही या मांडणीवर अटळ आहे.
 या लढाईत एक तिसरी मोठी विचित्र गोष्ट आहे. आजचे स्वदेशवाले गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनाच्या काळात स्वदेशीची आणि खादीच्या कार्यक्रमाची कुचेष्टा करीत असत. स्वदेशीच्या तीन लढायांबद्दल बोलण्याआधी आणखी एक मुद्दा मांडणे आवश्यक आहे. हा मुद्दा प्रथम जोतिबा फुल्यांनी मांडला. जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा जोतिबांनी एक प्रश्न विचारला, "तुम्ही 'राष्ट्रीय काँग्रेस' स्थापन करता आहात; पण हे 'राष्ट्र' कुठे आहे? 'राष्ट्र' याचा अर्थ "एकमय लोक' हिंदुस्थान तर जातीजातींमध्ये विभागला आहे. सवर्ण बहुजन समाजाला तुच्छ मानतात. ज्ञानाची सर्व मक्तेदारी सवर्णांच्या हाती आहे आणि आत्ताच आपण अश पेशावाईतून बाहेर निघालो आहोत की, जेथे एखादा 'महारा'चा मुलगा थुकी टाकण्यासाठी गळ्यात मडकं न बांधता पुण्यात गेला किंवा आपल्या सावलीने शहर अपवित्र होऊ नये म्हणून मागे केरसुणी बांधल्याविना गेला तर त्याचं मुंडकं गुलटेकडीच्या मैदानावर उडवलं जात असे. मग, कोणत्या राष्ट्रा'करिता स्वातंत्र्य मागता आहोत?" आपण आता जेव्हा स्वदेशी म्हणजे आपल्या स्वतःच्या देशात तयार झालेली वस्तू असे म्हणतो तेव्हा त्याची व्याख्या थोडी व्यवस्थित करणं आवश्यक आहे.

 स्वदेशीचा वाद ज्या ज्या देशात झाला तिथे तिथे देशातल्या दोन प्रकारच्या समाजांमध्ये आणि आर्थिक हितसंबंधाच्या लोकांमध्ये वाद झाला. इंग्लंडमध्ये जेव्हा कारखानदारीची वाढ झालेली नव्हती तेव्हा इंग्लंडमधल्या मालाला संरक्षण द्यावं, परदेशी मालाची आयात होऊ देऊ नये अशा तहेचा व्यापारी सिद्धांत (Mercantilism) तिथं मांडला जात असे. पुढे इंग्लंडची जसजशी प्रगती होत गेली आणि औद्योगिक क्रांती झाली आणि जर्मनी, फ्रान्स किंवा यूरोपमधील देशांच्या तुलनेने कारखानदारी मालामध्ये आपण वरचढ झालो असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा अॅडम स्मिथचं खुलेपणाचं तत्त्व मान्यता पावलं. त्यावेळा नेमकं उलटं जर्मनी आणि फ्रान्समध्ये घडलं. तेथील लोक खुलेपणाला विरोध

भारतासाठी । २१०