पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/197

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकष्टाने का होईना, जमले. कारण, तेथील हिंदु व शीख समाजांमध्ये खोल खाई आहे. हिंदुस्थानी लष्कराची स्थिती व्हिएटनाममधील अमेरिकन फौजेसारखी थेट झाली नाही. कारण, एकच की, पाकिस्तानविषयी काश्मिरी लोकांच्या मनात मोठी धास्ती आहे. हा वाद मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. काश्मिर प्रश्नावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान - दोन्ही देशांत कडेलोटाच्या तीव्र भावना आहेत. सार्वमत घ्यावे आणि उभय पक्षांनी निर्णय खिलाडूपणे मान्य करावा या अटीवर समझोता होण्याची शक्यता नाही. शस्त्रसंधी रेषा आता पन्नास वर्षे कायम आहे, देशाची फाळणी झाली तशी काश्मिरचीही झाली आहे. त्या फाळणीला फक्त अधिकृत मान्यता मिळण्याचेच बाकी राहिले आहे, ती देऊन हा प्रश्न सोडवावा असे धीटपणे सांगण्याची हिम्मत कोणत्याही पक्षाचे पाकिस्तानी सरकार करू शकणार नाही. हिंदुस्थानातही तीच स्थिती. दोनचार वेळा लपतछपत असा प्रस्ताव पुढे आला; अगदी सरकारी पातळीवरही या शक्यतेवर चर्चा झाली; पण, काश्मिरची फाळणी झाली तर लोकक्षोभाचा डोंब उठेल आणि अशा योजनेला पाठिंबा देणारांची त्यात आहुती पडेल हे इतके स्पष्ट होते की हा प्रस्ताव पुढे नेण्याचे धैर्य कोणाला झाले नाही.

 हिंदुस्थान-पाकिस्तानातील काश्मिर वादासारखीच परिस्थिती इस्त्रायल आणि अरब देशांतील संघर्षात आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान रबीन यांनी तडजोडीसाठी पाऊल पुढे टाकले आणि त्यांची हत्या झाली. काश्मिर प्रश्नावर समझोता करू धजावणाऱ्या हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी पंतप्रधानांची स्थिती तीच होणार आहे. शांततेचा मंत्र सांगणाऱ्या महात्मयाची हत्या करणाऱ्या या उपखंडात राजकीय समझोता करू पाहाणाऱ्या पुढायांचा काय टिकाव लागणार आहे? शस्त्रसंधी रेषेवर उभयतांची लष्करे सज्ज आहेत. दररोज घातपाताचे प्रकार घडत आहेत; पण तडजोड काढली तर आपली देशद्रोह्यांत गणना होईल या भीतीने कोणी समझोत्याचे पाऊल उचलण्यास धजावत नाही. गेल्या दोन महिन्यापासून तर दोन्ही देश हातात अणुबाँब घेऊन सज्ज झाले आहेत. अण्वस्त्रांचा वापर झाला तर साऱ्या आशिया खंडाचाच काय पृथ्वीचाही विद्ध्वंस होईल हा धोका असताना 'काश्मिर प्रश्नाचा समाधानकारक निर्णय झाल्याखेरीज आम्ही अणुबाँबचा पहिला वापर न करण्याचा करार करू शकणार नाही.' असे पाकिस्तानी पंतप्रधान म्हणतात. हिंदुस्थानचे पंतप्रधानही म्हणतात, "आक्रमणासाठी त्याचा वापर करणार नाही." एवढेच म्हणतात; पण आक्रमण म्हणजे नेमके काय याची व्याख्या जो तो आपल्या सोयीने करीत असतो. आपल्यावरच आक्रमण

भारतासाठी । १९७