पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेकौतुक करतात असं चित्र दिसतं. हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला पाहिजे की, अरे, असं हे सुख माझ्या आईबापांना आयुष्यामध्ये एक दिवससुद्धा भोगायला का मिळालं नाही? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, या प्रश्नाचं उत्तर जो अभ्यास देईल तीच खरी विद्या; या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तो सारा अभ्यास म्हणजे अविद्याच असं समजा."
 या पत्रात विद्यार्थ्यांना मी आणखी एक उदाहरण दिलं, तुमची परिस्थिती कशी आहे? तुम्ही शेतावरून शहरात आलात, म्हणजेच भारतातून इंडियात आलात. रामानं हनुमंताला जसं लंकेत पाठवलं तसं. तुमच्या आईबापांनी तुम्हाला इकडे पाठवलं आहे. यासाठी की, आपली श्रमसिद्ध संपदा भूमिकन्या सीता पळवून नेली आहे तिचा शोध तुम्ही काढावा; पण रामाने हनुमानाला पाठवल्यानंतर लंकेत आल्यावर, त्यानं सगळं काही पाहिल्यावर "वा! रावणाची लंका म्हणजे सोन्याची लंका, प्रचंड वैभवशाली रत्नहिरेमाणकेजडित महाल." असं म्हणून जर हनुमानाने विचार केला असता की, "अरे, कशाला जायचं रामाकडे परत, आहे काय त्याच्याकडे? कल्कलं नेसतो, कंदुळे खातो आणि झाडाखाली झोपतो. त्यापेक्षा रावणाकडे अर्जविनंती करून जर का त्याच्याकडे नोकरी शोधली तर मालामाल होऊन जाऊ." तर पुढचं रामायण घडलं नसतं.
 एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोध असं सांगितल्याला आता तेरा वर्षे झाली. उघड दिसतं आहे की, माझ्या भाच्यापुतण्यांनी हे काम काही केलं नाही. का केलं नसावं? माझ्या लहानपणी तिसरीचौथीच्या वर्गात अत्र्यांची एक कविता होती.
 शाळेत रोज जाताना
 मज विघ्ने येती नाना
 अशी तिची सुरुवात होती. मग तो विद्यार्थी एकएक अडचण सांगतो. वाटेत फुलपाखरे दिसतात, ती मला म्हणतात, ये आपण खेळू पण मी मोठ टाळतो.
 आणि मी निघे
 तडक शाळेला
 असा प्रत्येक वेळी त्या कडव्याचा शेवट होतो. कुठे टोळ दिसतात, ते म्हणतात ये खेळायला; कुठे गारुडी पुंगी वाजवत असतो, तर कुठे जादुगार खेळ मांडून बसलेला असतो. प्रत्येक वेळी मोहात अडकून घोटाळतो आणि शाळा चुकेल म्हणून मोह टाळून तो 'निघे तडक शाळेला.'

 मी विद्यार्थ्यांना सांगितलं की, या अभ्यासाच्या मागे लागा; पण झालं काय?

भारतासाठी । १७९