पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भेडसावत राहातो. हा महोत्सव चालू असतानाच देशात अशी परिस्थिती निर्माण झाली की वीजपुरवठा अधूनमधूनच होतो, रेल्वेगाड्या नवासा-सायासानेच येतात, पेट्रोलच्या दुर्भिक्ष्यामुळे गाड्या बंद पडल्या आहेत, सर्वत्र मंदीची व बेकारीची लाट आहे आणि रुपयाची किमत सकाळपासनच संध्याकाळपर्यंत घसरत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर? आज लक्षणे दिसतात की, ही संकटांची माला सुरू झाली आहे आणि महोत्सवाच्या काळातच आणिबाणिची परिस्थिती तयार होण्याची शक्यता जवळजवळ निश्चित.
 ५० वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रपिता गांधीजी कोणत्याच उत्सवात नव्हते, ते बंगालमधील दुःखितांचे अश्रू पुसत होते. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवाच्या वर्षी उत्सव होतील, अश्रू पुसणारा कोणीच असणार नाही.
 सुवर्णमहोत्सवाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत निदान एक दिवसाचा एक कार्यक्रम ठेवला जावा असे मला फार वाटते. संपूर्ण देशातील सर्व नागरिकांनी एक दिवस उपवास करावा आणि ज्याला ज्याला जे काही पवित्र वाटत असेल त्याला साक्षी ठेवून स्वतःलाच प्रश्न विचारावा, "गांधीजींचे स्वप्न का भंगले आणि नेहरूंची 'नियतीशी गाठ' हुकली कोठे?"

(२१ जानेवारी १९९७)

♦♦

भारतासाठी । १५७