पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'नियतीशी गाठ' हुकल्याचा महोत्सव?


 तीन आठवड्यांपूर्वी १९९६ चे वर्षे मावळून १९९७ उगवले. १९४७ साली येथून इंग्रज गेले, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला या घटनांना लवकरच ५० वर्षे पुरी होतील. साहजिकच, स्वातंत्र्याची ५० वर्षे पुरी झाल्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयाऱ्यांना आतापासूनच सुरुवात झाली आहे.
 केंद्र शासनाने हा महोत्सव धुमधडक्यात साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत. एक मंत्रीपातळीवर, एक अधिकाऱ्यांच्या पातळीवर आणि एक देशातील मान्यताप्राप्त व्यक्तींच्या पातळीवर. वेगवेगळ्या राज्यसरकारांनीही त्यांच्या त्यांच्या प्रदेशासाठी अशीच तयारी चालू केली आहे.
 स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीच्या दरबारगृहात आपले प्रख्यात 'नियतीशी गाठ' भाषण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा, अशोकचक्र चिन्हांकित तिरंगा झेंडा फडकला. सर्व देशभव लोकांनी प्रभातफेऱ्या, मिरवणुका, कवायती, रोषणाई स्वयंस्फूर्तीने केले; वरून धो धो पडणाऱ्या पावसाला न जुमानता बेहोश होऊन देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला.
 पहिल्या पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या त्यांच्या पहिल्या भाषणात 'राष्ट्रपिता' म्हणून ज्यांना गौरव केला ते महात्माजी स्वातंत्र्यदिनाच्या कोणत्याच जल्लोशात सामील नव्हते; बंगालमध्ये जातीय दंग्यात उद्ध्वस्त झालेल्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम ते करीत राहिले.

 स्वातंत्र्यदिनाचा सोहळा काही वर्षे लोक साजरा करीत राहिले. १९५० साली गणराज्याची घोषणा झाली. राजपथावर राष्ट्रपतींनी सर्व लष्करी तुकड्यांची सलामी शाही थाटात घेतली. देशभर पुन्हा एकदा सगळीकडे दीपोत्सव झाला.

भारतासाठी । १५३