मतदारसंघ वेगळे करू नयेत याकरिता स्वतः महात्मा गांधींनी उपोषण केलं होतं. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये या विषयावर मोठा संघर्ष तयार झाला होता.गांधीजींनी हरिजनांचा मतदारसंघ हिंदूंपेक्षा वेगळा असू नये असं ठामपणानं मांडलं.स्वातंत्र्यानंतर गांधीजींची ही कल्पना बाजूला ठेवण्यात आली, राजकीयदृष्ट्या अनुसूचित जाती-जमातींकरिता वेगळे राखीव मतदारसंघ देण्यात आले.एवढंच नव्हे तर नोकऱ्यांतसुद्धा त्यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात याव्यात असं ठरलं; ४० वर्षे त्याचा प्रयोग झाला.
वर आलेल्या आकडेवारीप्रमाणे साडेसत्तावीस टक्क्यांच्या आसपास भरती तर प्रत्यक्षात कुठेच झालेली दिसत नाही आणि जी काही भरती झाली त्यामुळेसुद्धा अनुसूचित जातीजमातींच्या सर्वसामान्य माणसांना काही फायदा झाला असंही दिसत नाही.दलित वर्गामध्ये काही 'ब्राह्मण' तयार झाले.भारतातून इंडियात गेलेली शेतकऱ्यांची मुलं जशी इंडियाची झाली; हनुमान लंकेला पाठवला आणि रावणाचं वैभव पाहून तो तिथंच राहावा असा जो काही प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला, तसंच दलितांच्या बाबतीतसुद्धा. ज्यांना राखीव जागांचा फायदा मिळाला ते पुढारी अत्यंत पाश्चिमात्य पद्धतीनं राहू लागले. संध्याकाळची व्हिस्की त्यांना आग्रहाने लागू लागली आणि त्यांचं जीवनमान सुधारल्यानंतरसुद्धा अनुसूचित जातीजमातींच्या सर्वसामान्य माणसांना या राखीव जागांचा फायदा मिळू शकला नाही. काही माणसं याचा गैरफायदा घेऊन गेली. दोन तीन पिढ्यांमध्ये बाप हा मोठा सरकारी अधिकारी झाला, त्याचा मुलगा मोठा डॉक्टर, वकील झाला आणि तरीदेखील अनुसूचित जाती जमातींकरिता मिळणारा फायदा हा त्यांच्या या तिसऱ्या पिढीतल्या अनुसूचित जाती-जमातीच्या माणसाला मिळू लागला; त्याच्या तुलनेने सर्वच दृष्टींनी मागासलेल्या सवर्ण वर्गाच्या विद्यार्थ्यांना किंवा माणसांना नाकारून त्यांना हा हक्क मिळू लागला. या परिस्थितीमध्ये साहजिकच काही तेढ आणि काही संघर्ष तयार होणं समजण्यासारखं आहे. एवढंच नव्हे तर अरुण शौरी यांनी त्यांच्या लेखात एक उदाहरण दिलं आहे. १९५७ मध्ये नोकरीला लागलेल्या एका माणसाची १९६६ मध्ये जन्मलेली एक मुलगी आहे. राजस्थानमधलं त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या एका अधिकाऱ्याला एकाच दिवशी दोन बढत्या मिळाल्या.राखीव जागांचे जे काही नियम करण्यात आले आहेत त्याचे असे हे काही विचित्र परिणाम दिसू लागले आहेत.त्यामुळे साहजिकच या सर्व राखीव जागा ठेवण्याच्या पद्धतीबद्दल इतरांच्या मनांत जबरदस्त शंका झाल्या.