पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 मला काही मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत ते अशाकरिता ही, चर्चा करताना आपण त्या गोष्टीचं भान ठेवावं. पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. मला इथं येताना पुण्याच्या माणसांनी बजावलं की, "लक्षात ठेवा तुम्ही जर का मराठवाड्याच्या बाजूनं बोलायला लागलात तर पश्चिम महाराष्ट्रात तुमची काही धडगत राहणार नाही, इथं काय होईल हे काही सांगता येणार नाही!" पण अशा धमक्या आपण पुष्कळदा ऐकतो. धमक्या मिळाल्या म्हणून काही आपण मत बदलत नाही. पहिली गोष्ट स्पष्ट अशी असली पाहिजे की, स्वतंत्र मराठवाडा मागणे म्हणजे काही स्वतंत्र खलिस्तान मागणे नाही. ही काही देशद्रोहाची मागणी नाही. दोन भावांना असं वाटत असलं की, आपला संसार चुली वेगवेगळ्या केल्या तर जास्त चांगला चालण्याची शक्यता आहे; खरं असेल, खरं नसेल, कदाचित चुली वेगळ्या झाल्याने दोघांचेही नुकसान होईल; पण दोघांना आज असं वाटतंय ना जर आपण वेगळे झालो तर आपलं बरं होईल! मग आपण समजुतीने चुली वेगळ्या केल्या तर त्यात काही देशद्रोह आहे असं नाही.

 मी आज वर्तमानपत्रात वाचलं; मला काही लोकांनी कवी सुरेश भट यांनी साहित्य परिषदेला लिहिलेलं पत्र दाखविलं की, स्वतंत्र विदर्भमागणे म्हणजे तो मराठी भाषेचा द्रोह आहे आणि राज्याचा द्रोह आहे मराठी टिकेल कशी? अन् राज्य टिकेल कसे? ही सुरेश भट यांची चिंता आहे मला वाटते की ती अभिनिवेशी चिंता आहे. ज्यांना प्रामाणिकपणे, वस्तुनिष्ठपणे विचार करायचा आहे त्यांनी हे समजून चाललं पाहिजे की, ही मागणी करण्यात देशद्रोह नाही आणि राज्यद्रोहही नाही. 'मराठी भाषेचा द्रोह आहे!' असे सुरेश भट यांचे म्हणणे आहे. मराठी भाषा फार काळ जगणार नाही अशी खंत मी एका वेगळ्या भाषणात (जवळाबाजार येथील मराठवाडा साहित्य संमेलनात) व्यक्त केली आहे. ते भाषण आता छापून प्रसिद्धही झालं आहे. एका मराठी राज्याची तीन मराठी राज्य झाली तर त्यामुळे मराठी भाषा बुडेल असं होण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण चर्चेमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. कारण भाषावार प्रांत रचनेची प्रेरणा कोणती? म. फुल्यांनी 'शेतकऱ्यांचा असूड'मध्ये ही प्रेरणा फार चांगली मांडलीय कोणत्याही एका राज्याची सरकारी भाषा ही तिथल्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा असावी. इथं लोक मराठी बोलतात ना! मग इथला कारभार मराठीत चालला पाहिजे का? त्यांनी उदाहरण दिले की, एक शेतकरी कोर्टात जातो, एक वकील त्याला न समजणाऱ्या भाषेत म्हणजे इंग्रजीत बोलतो. दुसरा वकील त्याला न समजणाऱ्या भाषेत उत्तर देतो. न्यायाधीश निवाडा देतो तो

भारतासाठी । १४०