पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकार हिंदुस्थानात घडतो आहे असं दिसतं आहे.

 मी नेहमी म्हणत असतो की शेतकऱ्याच्या मुलाइतका शेतकऱ्याचा शत्रू दुसरा कोणी नाही. शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाला, अधिकारी झाला आणि त्याचं पोट शेतीवर अवलंबून राहिनासं झालं की मग तो शेतकऱ्याची फारशी काळजी करत नाही. आईबापांनासुद्धा पैसे पाठविण्याचं काम करत नाही. तो आपण नवीन संस्कृतीमध्ये कसे सामावून जाऊ, त्यातच कशी प्रतिष्ठा प्राप्त करून घेऊ याचा प्रयत्न करायला लागतो. त्याप्रमाणेच, राज्याच्या सत्तेची जी काही चिन्हं आहेत, खुणा आहेत, प्रतिकं आहेत ती सगळी मागासवर्गीयांच्या हाती गेली; पण ती त्यांच्याकडे जाईपर्यंत त्यांच्या मनामध्ये मागसवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून आपण इथं आलो आहोत ही भावना राहिली नाही. उलट आपण शहरातल्या उच्चभ्रू समाजामध्ये त्यातल्या त्यात प्रतिष्ठेने, त्यातल्या त्यात थाटामाटाने कसं राहू ही इच्छा त्यांच्या मनात तयार झाली आणि राजकीय सत्ता हाती आल्यानंतरसुद्धा नोकरशाहीचा प्रभाव वाढत राहिला. पंतप्रधानांच्यासुद्धा हाती जितकी सत्ता नाही तितकी नोकरशाहीच्या हाती सत्ता आली हे उघड दिसतं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. त्यांच्यातलं महत्त्वाचं कारण मला एक असं दिसतं की जातिभावना असो किंवा नसो; पण सर्व समाजाला ब्राह्मणवर्ग किंवा सवर्ण जे काही करेल तेच प्रतिष्ठेचं आहे आणि आपली सगळी जगण्याची जी काही पद्धत आहे ती कुठंतरी कमी आहे अशा एक प्रकारच्या न्यूनगंडानं ग्रासलं आहे. त्यामुळे सवर्ण जे करतील तेच श्रेष्ठ; राजकीय सत्ता आपल्या हाती आली असली तरी सवर्ण जे करतात त्यालाच प्रतिष्ठा आपोआप प्राप्त होते असा काहीसा प्रकार आपल्यासमोर घडताना दिसतो आहे.

 जातीयतेचा एक परिणाम दिसतो की हजारो वर्षे श्रेष्ठ मानल्या गेलेल्या जाती जे करतील तेच श्रेष्ठ आहे, त्यांच्या हाती काल परवापर्यंत प्रतिष्ठेची जी काही साधनं किंवा प्रतिकं होती ती आमच्या हाती आली तर त्यातली प्रतिष्ठा किंवा महत्त्व निघून जातं असा काहीतरी एक विचित्र प्रकार समोर घडताना दिसतो आहे. राखीव जागांचा एक प्रयोग देशात झाला. गेली चाळीस वर्षे झाला आणि राखीव जागांचा प्रयोग ही काही तशी साधी गोष्ट नाही. राजकयी संस्थांच्या निवडणुकीमध्ये राखीव जागा असू नसेत, विशेषतः हरिजनांसाठी, अस्पृश्यांसाठी म्हणून मतदारसंघ वेगळे करू नयेत याकरिता स्वतः महात्मा गांधींनी उपोषण केले होते. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये त्यावेळी या विषयावर मोठा संघर्ष तयार झाला. आपले प्राण पणाला लावून हरिजनांसाठी, अस्पृश्यांसाठी

भारतासाठी । १४