पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेमोजावी लागते? हे सारे मोजमाप करताना ग्राहकाने अप्रत्यक्षपणे सोसलेल्या अनेक बोजांचीही मोजदाद झाली पाहिजे. विजेचा पुरवठा मिळवण्याकरिता करावी लागणारी मिनतवारी, यातायात, लाचलुचपत विसरून कसे चालेल. पुरवठा बंद पडला, नादुरुस्ती झाली म्हणजे ग्राहकालाच धावपळी करून दुरुस्ती करून घ्यावी लागते. काही खर्चही करावा लागतो, काही छोट्या मोठ्या ऑफिसरांनाही खुश करावे लगते. हा खर्चही कोठेतरी धरला गेला पाहिजे. मिळणाऱ्या वीजपुरवठ्याच्या सतत चढता, उतरता दाब त्यामुळे होणारे उपकरणाचे नुकसान आणि उत्पादनावरचा परिणाम यांचा रुपये पैशातील आकडा जबरदस्त मोठा आहे.
 हिंदुस्थानात आज जी वीज मिळते त्या गुणवत्तेच्या विजेकरिता ग्राहक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जी किमत अदा करतो ती लक्षात घेतली तर हिंदुस्थानातील वीजपुरवठा अत्यंत महागडा आहे, असेच सिद्ध होईल.
 विजेच्या काही ग्राहकांचे फार कोडकौतुक होते असा मोठा बोलबाला आहे. विशेषतः घरगुती ग्राहक आणि शेतकरी यांना वीजपुरवठा फारच स्वस्त भेटतो अशी हाकाटी सरकारी गोटातून सतत होत असते. यात काही मतलबी धूर्तपणाही आहे. राज्य विद्युतमंडळे व्यावसायिक पायावर चालली पाहिजेत हे मान्य केले तरी त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आहे. अशा व्यवसायात दरांची आकारणी सरासरी उत्पादनखर्चावर आधारित नसते. ग्राहकांचे वेगवेगळे गट मानावे लागतात. कारखान्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी वीज पुरवावी लागते. पुरवठ्याची गणवत्ता चांगली असावी लागते. पुरवठ्यात खंड येऊन चालत नाही. याउलट, शेतीपंपांना पुरवली जाणारी वीज इतर ग्राहकांना वीज नको असते अशावेळी दिली जाते आणि तिची गुणवत्ता दुय्यम दर्जाची असते. शेती आणि उद्योगधंद्यांना एकसारखाच दर लावावा असा वाद घालणे अज्ञानमूलक आहे.
 विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या ग्राहकांना विशेष सवलतीचे दर द्यावे हेही सार्वजनिक सुविधा व्यवसायात अक्कल हुशारीचेच मानले जाते. घरगुती वापराचा दर कारखानदारी दरांपेक्षा सर्वत्र अधिक असतो. त्यामुळे उत्पादनास प्रोत्साहन मिळून सर्वसाधारण जनतेचे भले होते. रोजगार वाढतो. मिळकत वाढते आणि म्हणून घरगुती ग्राहक उद्योगधंद्यांना दिलेल्या सवलतीचे स्वागत करतात. आपला देशमात्र याला अपवाद आहे.

 सार्वजनिक सुविधाव्यावसायांना दरांची आकारणी ठरवताना काही व्यापक

भारतासाठी । १३१