पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


४० वर्षे ही योजना राबवल्यानंतर प्रत्यक्ष आकडेवारी पाहायला गेलो तर प्रथम श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींचं प्रमाण हे फक्त साडेआठ टक्के आहे. आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये म्हणजे जमादार, पट्टेवाले, साफसफाई कामगार हे जरी घेतले तरी त्यांचं प्रमाणसुद्धा साडेसत्तावीस टक्क्यांच्या आसपास आलेलं नाही, आजही त्यांची टक्केवारी २० ते २२ च्या दरम्यानच आहे.
 म्हणजे आपल्याला दोन विभिन्न प्रवाह दिसतील. राजकीय सत्ता, निदान संख्या पाहिली तर इतर जमातींच्या हाती गेलेली आहे. शासकीय सत्ता पाहिली तर ती मात्र अजूनही सवर्णांच्या आणि त्यातल्या त्यात उच्च सवर्णांच्या हाती राहिली आहे. असे हे दोन वेगळे प्रवाह आहेत.
 पण शेवटी नोकरशाही ही राजकीय सत्तेची नोकर आहे. एखाद्या मंत्रालयाचा सचिव जरी झाला तरी तो शेवटी मंत्र्याच्या हाताखाली, मंत्र्याच्या आदेशआज्ञांप्रमाणे काम करतो. मग राजकीय सत्ता मागासलेल्या वर्गांच्या हाती गेली किंवा ब्राह्मणेतर वर्गांच्या हाती गेल्यानंतर या नोकरशाहीकडून त्यांनी आपल्याला पाहिजे तसं काम करून घेणं शक्य होतं, आवश्यक होतं; पण प्रत्यक्षात असं घडलेलं मात्र दिसत नाही. असं का होतं?

 एक दुसरं उदाहरण मी तुमच्यापुढं ठेवतो. अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आणि यादवी युद्धानंतर गुलामगिरीची प्रथा संपली. आणि सर्व काळ्या माणसांना निदान कागदोपत्री घटनेत समान हक्क देण्यात आले. काहींची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारू लागली आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत होती ते निग्रो प्रतिष्ठा म्हणून गोरे लोक ज्या भागामध्ये राहतात त्याच भागामध्ये घर घेण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे ज्यांची परिस्थिती सुधारली त्यांनी उरलेल्या निग्रो लोकांच्या सुधारणेकरिता काम करण्याऐवजी त्यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर गोऱ्यांच्या वस्तीमध्ये जाऊन गोऱ्यांच्याच पद्धतीने, काही बाबींमध्ये गोऱ्यांच्याही पेक्षा जास्त गोऱ्यांसारखं वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जिथं गोऱ्यांच्या वस्तीमध्ये काळ्यांची संख्या वाढत चालली तिथं असं लक्षात आलं, की काही दिवसांनी गोऱ्यांनीच त्या वस्त्या सोडून दुसरीकडे जायला सुरुवात केली आणि या पद्धतीने अमेरिकेतल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या शहरांमध्ये जुन्या काळी शहराच्या मध्यभागी असलेल्या ज्या काही वस्त्या प्रतिष्ठित समजल्या जात होत्या त्या सगळ्या वस्त्या आता जवळजवळ काळ्या लोकांच्याच झाल्या आहेत. आणि गोऱ्या लोकांच्या सगळ्या वस्त्या मोठ्या शहरांच्या बाहेर जी उपनगरं आहेत, त्यामध्ये उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे काही

भारतासाठी । १३