पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वीजदरवाढ - धोक्याची घंटा


 नमेचि येतो मग पावसाळा' अशी जुनी शोलय कविता. आजकाल पावसाळा फारसा नेमाने येत नाही; त्यापेक्षा जास्त नियमितपणे पावसाच्या आधी एक वर्षाआड विजेचे दर वाढतात. मे ९० मध्ये वाढले २२ टक्क्यांनी. मे ९२ मध्ये १८ टक्क्यांनी, मे ९४ मध्ये १० टक्क्यांनी, ९४ साली निवडणुकांची हवा असल्याने दरवाढ तशी नेमस्त होती. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर यंदा विजेचे दर वाढणार, दणक्यात वाढणार अशी अपेक्षा होतीच. वीसपंचवीस टक्क्यांनी दर वाढवणार अशी हवा होती. दरवाढीची घोषणा झाली त्यांत वाढीचे प्रमाण साडेसतरा टक्के असल्याचे म्हटले होते. दरवाढीविरुद्ध कोणी फारशी तक्रार केली नाही. काही ग्राहकसंघांनी निषेधाच्या तारा दिल्या पीठगिरणीवाले १८ जुलैपासून पिठाच्या गिरण्या बंद ठेवणार होते, त्यांना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले म्हणून ते थांबले; पण एकूण फारसा विरोध काही झाला नाही.
 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकर धोंडगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली, सुनावणी कधी होईल ती होवो. विजेच्या दराच्या प्रश्नासंबंधी सर्वसाधारण लोकांत जाणकारी फारच कमी.
 वीज आणि शेतकरी

 डिझेल इंजिनाची यातायात फार, त्यापेक्षा विजेची मोटार जास्त सोयीची आणि कमी खर्चाची अशी शेतकऱ्यांची भावना. बहुतेक ठिकाणी वीज पहिल्यांदा शेतात येते आणि मग घरात. वीज मिळवायची म्हणजे अर्ज करायचा. मग यथावकाश अनामत रक्कम आणि खर्चापोटी काही रक्कम भरण्याची नोटीस येते. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (म. रा. वि. मं.)मध्ये ओळख असेल

भारतासाठी । १२३