पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडले. हातपाय, डोकी इकडे तिकडे उडाली. कितीएक चेंगरले. कित्येक विजेच्या झटक्याने मेले. मग नंतर नेहमीप्रमाणे सगळे झाले. आसपासच्या रहिवाशांनी, ज्यांना सहज सोडवण्यासारखे त्यांना सोडवले. मग, पोलिस आले, त्यांनी प्रेतांच्या अंगावरचे दागिने, घड्याळे आणि इतस्ततः विखुरलेल्या किंमती वस्तू उचलण्याचा धडाका लावला.
 रेल्वेमंत्री जाफर शरीफ इंग्लंडमध्ये सुटीवर गेले होते. ते हजर असताना झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचा खुळचट लालबहादुरी विचार त्यांच्या मनाला कधीही शिवला नव्हता. या अपघाताबद्दल साधे दुःख व्यक्त करण्याचेही त्यांना काहीच प्रयोजन नव्हते. दोनचार दिवसांनी अपघातस्थळातील रौद्र भीषणता थोडी ठाकठीक झाल्यावर पंतप्रधान अपघातस्थळाचे निरीक्षण करायला गेले. अशा प्रसंगीही लोकांनी काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणा केल्या. पंतप्रधानांकडे रेल्वे खात्याचा कारभार शरीफ साहेबांच्या सुटीच्या अवधीपुरता आलेला. त्यांना अपघाताची कारणे, उपाययोजना असल्या बाबींवर तोंड उघडण्याचे काहीच कारण नव्हते. तोंड बंद ठेवण्याकरिता मशहूर असलेल्या राव साहेबांनी तोंड उघडले आणि दोन मुद्दे मांडले.
 पहिला - भारतातील लोहमार्गांवर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक संदेश व्यवस्था बसवली पाहिजे. तंत्रज्ञान कोठून यायचे? आमच्या येथे तर इलेक्ट्रॉनिकचे कोणते साधन बिघडले तर दुरुस्त करणारा भेटत नाही. साध्या यांत्रिकी व्यवस्थेत एखादा घोरेलाल कत्तल घडवू शकेल; पण यंत्रणेत बिघाड असला तर स्थानिक मिस्त्री तो नीट करू शकेल. इलेक्ट्रॉनिक व्यवस्था भारतातील लोहमार्गांवर बसवली तर गाड्या धावतात त्यापेक्षा अधिक वेळ उभ्या राहण्याचीच शक्यता आणि अपघात होण्याच्या शक्यतांची तर महाद्वारेच उघडतील.

 पंतप्रधानांनी आणखी एक महाभयानक विधान केले. बिनराखीव डब्यातील गर्दीत बसलेल्या प्रवाशांची शरीरे इतकी छिन्नविछन्न झाली की, त्यांची ओळख पटण्याची काहीसुद्धा शक्यता राहिली नाही. पंतप्रधानांची प्रतिभा पाजळली - "दुसऱ्या दर्जाच्या बिनराखीव डब्यातील प्रवाशांच्या कलेवरांची ओळख पटवता येईल अशी व्यवस्था केली पाहिजे." इति करवादले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव. म्हणजे, थोड्याच दिवसात दुसऱ्या वर्गाच्या साध्या प्रवाशांना त्यांच्या पायात एक, दंडात एक आणि गळ्यात एक अशा नंबरच्या पट्ट्या बांधून प्रवासाला निघावे लागेल. फिरोजाबादच्या भयानक अपघातावर पंतप्रधानांची ही

भारतासाठी । १२१