पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कोसळत्या व्यवस्थेतील पडझड


 प्रख्यात हिंदी व्यंगकार दिवंगत शरद जोशी यांचे 'पोस्ट ऑफिस' हे मोठे गाजलेले प्रहसन आहे. इंग्रजांनी हिंदुस्थानात टपालाची व्यवस्था चालू केली ही मोठी भाग्याची गोष्ट. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काही काळतरी जनतेला सहजरित्या पत्रे टाकता आली आणि मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात 'पोस्ट ऑफिस'ची सुरुवात झाली असती तर काय झाले असते? आम्हाला, पोस्ट ऑफिस चालू करू अशा नुसत्या घोषणाबाजीवरच एखादी निवडणूक सहज जिंकून नेता आली असती. दुसऱ्या टप्प्यात मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरांपुरतीच टपालाची व्यवस्था सुरू करण्यात आली असती पण ती व्यवस्था परदेशी पद्धतीची नाही. खास 'स्वदेशी' असती. म्हणजे, टपालपेटी रस्त्यावर कोठेही अनाथ, बेघर दिसली नसती, टपाल कचेरीच्या मध्यभागी चार बंदुकधारी संत्र्यांच्या पहाऱ्यात उभी राहिली असती; पत्र टाकण्यासाठी लायसेंस-परमिट काढण्याची यातायात करावी लागली असती; त्यासाठी अर्ज, त्यांच्या अनेक प्रती, त्याला जोडायची प्रमाणपत्रे, द्यावी लागणारी चिरीमिरी सगळे काही करून पत्र टाकायची परवानगी मिळाली म्हणजे मोठी बाजी मारल्याचा उत्साह वाटला असता; टपालामार्फत सरकारविरोधी लोक त्यांचा प्रचार करतात असे दिसले की आणिबाणी जाहीर करून मनाला येईल तेव्हा टपालव्यवस्था बंद केली गेली असती.

 व्यंगकार शरद जोशींचे स्वातंत्र्योत्तर पोस्ट ऑफिसविषयीचे चित्रण हे असे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, इंग्रजांनी चालू केलेल्या व्यवस्थेचाही भरपूर बट्ट्याबोळ करून 'स्वदेशी' पद्धतीचे पोस्ट ऑफिस तयार करण्यात आम्ही मोठे यशस्वी झालो आहोत. टपाल इतक्या तासात सोडा, दिवसात मिळाले पाहिजे असा वाह्यात 'परदेशी' आग्रह संपला. टाकले आहे ना, मग यथावकाश ते पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पत्राची पत्रिका बरी असली आणि ग्रहमान ठीक

भारतासाठी । ११९