पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगात घडू लागला आहे. आजपर्यंत एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजव्यवस्थेचे मोठेपण ती व्यक्ती किंवा व्यवस्था दुसऱ्यांसाठी किती काम करते आहे, "दुःखतप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्'साठी ती किती काम करते आहे यावर ठरत असे; पण दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांनी शेवटी काय साध्य केले हे तपासायला गेलो तर लक्षात येते की, जाहीररित्या स्वार्थ साधणाऱ्या लोकांनी जगाचं फारच कमी नुकसान केलं आहे; उलट, परमार्थाच्या गोष्टी करणारांनी जगाचं फार मोठं नुकसान केलं आहे. एकूण परिस्थितीवर प्रामाणिकपणे चिंतन करावयाचे असेल तर या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की स्वार्थ आणि परमार्थ यापैकी कोणत्या प्रवृत्तीने जगाचे जास्त नुकसान केले.
 जेथे जेथे संपत्ती गोळा होते, जेथे जेथे सत्ता असते तेथे भ्रष्टाचार येतो आणि समाजात सत्ताकेंद्र असल्याशिवाय चालत नाही. समाजवादाने मांडणी केली की, समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षमतेनुसार समाजाला काही देत राहाते आणि आपापल्या आवश्यकतेइतकंच समाजाकडून घेत राहाते असं झालं तरच माणूस 'समाजवादी व्यक्ती' बनेल आणि त्यातून भ्रष्टाचाराचा प्रश्न मिटून जाईल. कितीतरी वर्षे निघून गेली. मार्क्सचाही पाडाव झाला; पण अशी 'समाजवादी व्यक्ती' काही तयार झाली नाही. मोठमोठ्या संस्थांमध्ये महात्मा गांधींच्या कल्पनेनुसार 'विश्वस्त' भावनेने काम करणारी माणसेही सापडणे दुर्मिळ, असतीलच तर ती नियम सिद्ध करायला लागणाऱ्या अपवादाइतकीच सापडतील. समाजवादाची मांडणी होऊन शंभर वर्षे होऊन गेली; पण अशी उन्नत 'समाजवादी व्यक्ती' तयार होऊ शकली नाही. तेव्हा आता समाजाला समजून चुकले आहे की असा कुणी उन्नत महात्मा वरून येणार नाही जो आपल्याला आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवील. आर्थिक उन्नतीसाठी आजवर अनेक महात्म्यांनी परमार्थाचा, समाजकल्याणाचा मार्ग सांगितला; पण त्या मार्गाने सर्वसामान्यांची काही आर्थिक उन्नती झालेली दिसत नाही; उलट, समाज आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक खोल गर्तेत चाललेला दिसत आहे.

 आता हे सिद्ध झाले आहे की कुठे मॉस्कोमध्ये बसून किंवा दिल्लीमध्ये बसून कोणी किती धान्य पिकवावे, कोणी किती उत्पादन करावे हे ठरवून समाजाची प्रगती होऊ शकत नाही. लोकांना हेही समजते आहे की याला चांगली पर्यायी व्यवस्था समोर दिसत नाही. आज नाही. उद्यापरवाही असेल किंवा कसे सांगता येत नाही; पण त्यांना एक गोष्ट निश्चित समजते की, माणसाला आपापल्या कुवतीनुसार एका विशिष्ट व्याप्तीच्या क्षेत्राची जाण होण्याची नैसर्गिक

भारतासाठी । ११७