पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


चुकीच्या दिशेने घेऊन जात होते - ज्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले. देश बुडाला आणि आज साऱ्या देशाला कळून चुकलं आहे की ती चुकीची दिशा होती. तेव्हा ती दिशा चुकीची आहे हे देशाला सांगण्याची जबाबदारी स्वतःला गांधी परिवारातील म्हणविणारांची होती. गांधी परिवाराने गेल्या सत्तेचाळीस वर्षांत आपली ही जबाबदारी पार पाडली आहे का? का तेसुद्धा शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसवलतीतच गुंतून पडले? नेहरू राजवटीने देशाची, देशातील सर्वसामान्य जनतेची जी लूट केली त्यात अन्यार्थाने गांधी परिवाराचाही काही हात नव्हता ना?
 तिसरा पक्ष आहे कांशीरामजींचा बहुजन समाज पार्टी. ते लोक तर आजही गांधीजींना खुलेआम शिव्या देत आहेत. त्यांना म्हटलं की, यात सभ्यपणा नाही, शिष्टाचार नाही तर तेही ते मानायला तयार नाहीत. गांधीजींच्या 'हरिजन' शब्दाचीही ते कुचेष्टा करतात. या पक्षाच्या लोकांनी गांधीजींच्या समाजशास्त्राची हत्या केली आहे.
 देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्तेचाळीस वर्षांनी आज लोकांसमोर तीन पक्ष आहेत - एक गांधीजींच्या देहाच्या हत्येशी संबंधित, दुसरा त्यांच्या अर्थविचाराच्या हत्येशी संबंधित आणि तिसरा त्यांच्या समाजशास्त्राच्या हत्येशी संबंधित. गांधीजींच्या या सेवाग्रामच्या आश्रमामध्ये वृक्ष वाढत आहेत, रोपे वाढत आहेत; इथे सावलीही भरपूर आहे; इथे आल्यानंतर इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळतो; पण गांधी विचारांचा जो आत्मा आहे तो पुढे नेणारं आंदोलन काही या आश्रमातून पुढे आले नाही. मग गेल्या सत्तेचाळीस वर्षांत गांधी या महात्म्याच्या या तिहेरी हत्येला या महात्म्याच्या सावलीत विश्रांती घेणारा गांधीपरिवारही जबाबदार नाही काय?
 गांधी परिवाराने सेवाग्राममधून गांधीजींचा कार्यक्रम पुढे आणण्याचे आंदोलन उभे केले नाही कारण ते गांधीजींच्या सावलीत अडकून पडले, त्यांची केवळ पूजाअर्चा करीत राहिले. गांधीजींनी निर्माण केलेल्या सावलीत काही काळ विसावून पुढच्या मार्गक्रमणेस सुरुवात करण्याऐवजी ते या मठात तळ ठोकून बसले आणि माझं स्पष्ट मत आहे की, एका मठातून दोन महात्मे कधीच निर्माण होऊ शकत नाहीत. एका मठातून एकच महात्मा बनतो, त्यातील बाकी सर्वजण त्या मठाच्या सावलीतच अडकून बसतात, त्यांच्याकडून दुसरी क्रांती घडल्याचे ऐकिवात नाही.

 मला असं वाटतं आहे की मोठा बदल, केवळ देशातच नव्हे तर साऱ्या

भारतासाठी । ११६