पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"मला हे सैद्धांतिकदृष्ट्या अशक्य वाटते." तेव्हा ते म्हणाले, "आम्ही सर्व तऱ्हेने विचारविमर्श करून या निर्णयाप्रत आलो आहोत की गांधीजी 'संपूर्ण महात्मा होते." मला वाटतं अशी माणसं 'ऊशीप ज्ञहरी हश वेशीप ज्ञ' (म्हणजे त्याला समजत नाही की, त्याला समजत नाही.) या प्रकारात बसतात.
 मी आग्रहपूर्वक मानतो की गांधीजींना सापडलेला सत्यकण जोपासून पुढे नेणारा मी आहे आणि यातच गांधीजींबद्दलचा माझ्या मनातला परम आदर मी व्यक्त केला आहे. परमेश्वराची कल्पना पिता म्हणून केली तर कोणाही पित्याला आपला मुलगा सकाळ दुपार संध्याकाळ, सर्व काळ आपल्या पायाला हात लावून सतत आपली पूजा करीत राहावा असं वाटणार नाही. अशा पूजेने चांगला पिता खुश होईल असं मला वाटत नाही. त्याचप्रमाणे, महात्म्यांच्या बाबतीतही त्यांची सकाळ, संध्याकाळ पूजा करणे, त्यांनी सांगितलेला शब्द न् शब्द बरोबरच आहे, त्यात चुकीचं काही नाही, असं मानणं म्हणजे त्या महात्म्यांशी केलेला द्रोहच आहे.
 महात्म्यांसंबंधी या विवेचनात विशेषकरून मी महात्मा गांधीजींच्या संदर्भात भर देणार आहे. कारण महात्माजींचा अभ्यास गांधीभक्तांप्रमाणे मीही केला आहे. गांधीजींचं जे काही साहित्य माझ्या वाचनात आलं आहे त्यावरून मी ठामपणे म्हणू इच्छितो की 'गांधीजींइतका गतिमान (Dynamec) दर्शन देणारा महात्मा सापडणे विरळाच.'
 सेवाग्रामला मी बऱ्याचदा येतो, येत राहणार आहे; यावंसं वाटतं; पण इथे आल्यानंतर एका गोष्टीचे दुःख होतं. खरं तर सेवाग्राम हे एक स्फूर्तिस्थान आहे. इथे माझ्यासारखे, जे गांधीपरिवारातील म्हटले जात नाहीत, आले म्हणजे त्यांच्याही मनामध्ये काही ना काही प्रेरणा उचंबळून येतात; पण एक प्रश्नही उभा राहतो. गेल्या सत्तेचाळीस वर्षांमध्ये, गांधीजींच्या निर्वाणानंतर गांधीपरिवाराने आपली जबाबदारी पार पाडली आहे काय? मला वाटतं कोणीतरी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं पाहिजे.
 गेले दोन महिने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत मी निवडणुकीच्या प्रचारसभांतून भाषणे करीत फिरतो आहे. प्रत्येक भाषणात काही प्रश्न पुढे ठेवले. त्या प्रश्नांवर विचारविमर्श होणे आवश्यक आहे.

 पहिला प्रश्न. गांधीजींची इच्छा सव्वाशे वर्षे जगण्याची होती. आज गांधीजी असते तर ते सव्वाशे वर्षे वयाचे असते. आज जर ते असते तर त्यांनी फक्त पंचा वापरण्याऐवजी अंगभर कपडे वापरायला सुरुवात केली असती का? ते

भारतासाठी । ११४