पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाहेर पडण्याची त्यांनी हिम्मत दाखविली नाही.
 मी आजवर अनेक वेळा म्हटले आहे की, महात्म्याचं खरं दुर्भाग्य हे की त्यांचा पराभव जगाने नाही केला, त्यांचा पराभव त्यांच्याच शिष्यांनी केला. त्यांचे शिष्य त्यांना पूर्णांशाने समजू शकले नाहीत आणि त्यांच्या समजुतीमध्ये ज्या गोष्टी बसल्या त्याच ते कर्मकांडाप्रमाणे करत बसले. जयंत्या-पुण्यतिथ्या करणे ठीक आहे, त्यांनाही काही महत्त्व असते; पण त्यातच अडकून राहणे आणि महात्म्याला सापडलेला सत्यकण डावलून फक्त त्या महात्म्याची व्यक्तिपूजा करत राहणे यातच महात्म्यांच्या पराभवाची सुरुवात होते.
 माझं हे विवेचन बऱ्याच जणांना मान्य होणं अवघड आहे. मी स्वत:ला, गांधीजींना सापडलेला सत्यकण जोपासणारा मानतो; पण त्याचबरोबर मी सातत्याने मांडत आलो आहे की कोणा एका व्यक्तीला प्रमाण मानणे आणि असे म्हणणे की कोणत्याही समस्येची उकल कोण्या एका व्यक्तीच्या विचारधारेमध्ये किंवा कोण्या एका ग्रंथामध्ये मिळू शकते हे चूक आहे. असं जर कुणी मनापासून मानत असेल तर त्याचा अर्थ इतकाच की त्या व्यक्तीसमोर खरे प्रश्न अजून आलेच नाहीत. भगवान कृष्ण असो, पुरुषोत्तम राम असो की महात्मा गांधी असोत. कितीही मोठा महात्मा असला तरी तो सांत (Finite) रूप घेऊनच जन्मला होता, कोणीही अनंतर (Infinite) रूपाने जन्मला नव्हता ही बाब जोवर खरी आहे तोपर्यंत सांत महात्म्यांचे दर्शन-विचारप्रणाली अनंत काळपर्यंत चालणारी आहे असं जर कुणी म्हणायला लागलं तर त्याचा अर्थ इतकाच की असं म्हणणारानं अजून विचार करायला सुरुवातच केलेली नाही.
 याचप्रमाणे, जे लोक धर्माच्या अभिमानाच्या गोष्टी बोलतात त्यांच्या बाबतीतही हेच आहे. मी त्या धर्माभिमान्यांना मानायला, त्यांच्याबद्दल आदर बाळगायला तयार आहे की ज्या धर्माचा ते सन्मान करतात, अभिमान बाळगतात, गर्व करतात तो धर्म त्यांना जन्माच्या अपघाताने मिळालेला नाही. ज्या धर्मात जन्मला त्याचा अभिमान बाळगताना त्या धर्माचा विचारपूर्वक अभ्यास केला असण्याची शक्यता नसेल असे नाही; पण असा अभ्यास केल्याचे सिद्ध करून दाखवावे लागेल. जो धर्म जन्माच्या अपघाताने मिळालेला नाही त्याबद्दल एखादी व्यक्ती अभिमान बाळगत असेल तर तिने त्या धर्माचा विचारपूर्वक अभ्यास केला आहे असं समजायला हरकत नाही.

 गांधीजींच्या एका परमभक्ताबरोबर चर्चा चालली होती. ते म्हणाले की, "आम्ही गांधीजींना एक प्रकारे 'संपूर्ण महात्मा' मानतो." मी जेव्हा म्हटले की,

भारतासाठी । ११३