पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेत्यांची लोकसंख्यावाढीची गती मेक्सिकोत राहिलेल्या गरीब शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे असे दिसून आले. यावरून संपन्नतेमुळे लोकसंख्या वाढीची गती अधिक होते असे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न तुटपुंज्या मोडक्यातोडक्या आकडेवारीच्या आधाराने करण्यात आला आहे.
 एकट्यादुकट्या पाहणीवर एवढा मोठा निष्कर्ष काढणे संख्याशास्त्रास धरून नाही. एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन सुबत्ता मिळवणाऱ्या लोकांची वागणूक देशातल्या देशातच विकास साधणाऱ्या लोकांसारखीच असेल असे गृहीत धरणेही चुकीचे आहे. संपन्नता मिळालेल्या कुटुंबात पहिल्या पिढीची वर्तणूक नव्या अनुभवाने थोडी थोडी अस्ताव्यस्त होण्याची शक्यता असते, तसेच विदेशी स्थायिक झालेल्या पहिल्या पिढीचे असते. नवी संपन्नता टिकून राहणार आहे असा आत्मविश्वास आलेल्या नंतरच्या पिढीत मात्र मुलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो. मेक्सिको ते लॉस एंजिलिस हे अंतर तसे लहान आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले मेक्सिकन वारंवार आपल्या मायदेशी भेटीसाठी परततात. त्यांच्या पाहणीवरून काढलेला निष्कर्ष हिंदुस्थानी लोकांसारख्या लांबवरून येऊन स्थायिक झालेल्या आणि पाच दहा वर्षांनी क्वचितच मायदेशी भेट देणाऱ्या कुटुंबांना लागू पडणार नाही. या साऱ्या गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. तरीही मेक्सिकन लोकांच्या एका किरकोळ पाहणी अभ्यासाचा उपयोग बुखारेस्ट परिषदेचे सारे निर्णय उलथवण्यासाठी कैरो येथे होणार आहे.
 हा खेळ आगीशी
 या बंडामागे कुटुंबनियोजन क्षेत्रातील उद्योजक आहेत, संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय त्यांनी ताब्यात घेतलेले दिसते. देशोदेशाचे स्वामीनाथन आणि सरकारशाहीवादी त्यांच्यामागे उभे आहेत. कैरो परिषदेत गाजर-दंडा पद्धतीच्या उपायावर भर दिला जाईल. मध्यममार्गी तृतीयपंथी हिंदुस्थान सरकारला तो सोयीचा वाटेल. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न सरकारी यंत्रणेकडे राहिला तर येत्या ५० वर्षांत लोकसंख्या दुप्पट होईल आणि अन्न, पाणी, हवा यांच्या पुरवठ्याचा गंभीर प्रश्न तयार होईल हे नक्की.

(६ सप्टेंबर १९९४)

♦♦

भारतासाठी । ११०