पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सबळ आणि सज्जड कारणं आहेत, पुरावा आहे असा युक्तीवाद एमिल झोलानं कोर्टापुढे केला. कोर्टात साक्षीपुरावे मांडले जाऊ लागले. अनेकजण भीती, संकोच बाजूला ठेवून कोर्टासमोर येऊन बोलू लागले. परिणाम असा झाला की, खटला कागदोपत्री एमिल झोलावर; पण प्रत्यक्षात ड्रेफसचं सारं प्रकरण पुन्हा एकदा उघडलं गेलं. एमिल झोला निर्दोष ठरले एवढंच नाही तर ड्रेफसलाही निर्दोष म्हणून तुरुंगातून सोडावं लागलं.
 महाराष्ट्रात आजच्या बिकट काळी आलेल्या काळ्याकुट्ट ढगांचं सावट दूर करण्याची चांगली संधी आली आहे. खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी हा खटला सरकारी वकिलांची आणि यंत्रणेची मदत न घेता लढवायला हवा. त्यांनी सरकारी म्हणून हा खटला चालवला तर काही प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढे होऊन आम मराठी जनतेला पवारसाहेबांविरुद्ध काय साक्षीपुरावे असतील ते घेऊन पुढे येण्याचं आवाहन करावं. म्हणजे खैरनारांवरील अब्रुनुकसानीच्या खटल्यात काय ती सगळी घाण एकदाच वाहून जाईल आणि सारा महाराष्ट्र निर्मळ स्वच्छ वातावरणात साहेबांना प्रिय असलेल्या विकासाकडे पावलं टाकू लागेल. साहेबांची हीच इच्छा असावी आणि खैरनारांनी आजपर्यंत अनेक प्रकरणी मोठं धैर्य आणि निश्चय दाखवला आहे. ते साहित्यिक नाहीत, साधे नोकरदार आहेत तरीही महाराष्ट्राचे 'एमिल झोला' बनणं त्यांना शक्य आहे.

(७ जून १९९४)

♦♦

भारतासाठी । १०५