पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हे 'अग्निदिव्य' आवश्यक आहे


 महाराष्ट्राचे विद्यमान आणि शेवटच्या मोजणीपर्यंत पूर्वी तीन वेळचे मुख्यमंत्री, देशाचे माजी रक्षामंत्री आणि पंतप्रधानपदाचे प्रथम इच्छुक माननीय शरदचंद्ररावजी पवार यांचं अभिनंदन करण्याचा प्रसंग तसा दुर्मिळ असतो. आज असा प्रसंग उभा राहिला आहे. पवारसाहेबांचं मोकळ्या मनानं अभिनंदन केलं पाहिजे.
 पवारसाहेब कुशल राजकारणी आहेत. जन्मदा बुद्धीची तल्लखता, निसर्गसुलभ बहुश्रुतता त्याबरोबर प्रतिभावान, व्यासंगी मंडळींना पदरी बाळगण्याची हातोटी या गुणांनी त्यांचं नेतृत्व असाधारण मानलं जातं. महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्याहीपेक्षा विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांची त्यांना खडान्खडा बित्तंबातमी. सरकारी नोकरवर्गापैकी बहुतेकांशी चांगली बैठकीच्या घसटीतली जानपहचान. साहेबांनी एखादी इच्छा व्यक्त केली की ती पुरेपूर पाळण्याकरता तनमनाची नसली तरी धनाची बाजी लावायला अनेक कार्यकर्त्यांचे ताफेच्या ताफे सज्ज असतात. पवारसाहेब निसर्गसिद्ध नेते आहेत, हे त्यांच्या शत्रूलाही कबूल करावं लागेल.

 पण या नेतृत्वावर एक सावट पडलेलं आहे. सार्वजनिक कामामध्ये साहेबांनी पैसा भरपर जमा केला आहे अशी लोकांत वर्षानवर्षे वदंता आहे. खरं खोटं काय याचा तपास, निवाडा करणं सर्वसामान्यांना शक्य नसतं; पण संशयाचा फायदा साहेबांना मिळत नाही. हजार वेळा हजार लोकांनी आरोपांची चिखलफेक केली की, साहजिकच थोडातरी चिखल चिकटतोच. सगळ्या गप्पांत काहीतरी तथ्य असलंच पाहिजे असं लोकांना वाटू लागतं. काँग्रेस पक्षातील साहेबांच्या सहकाऱ्यांकडे हा विषय काढला तर ही मंडळी झटकून निषेध करत नाहीत. आपल्या नेत्याच्या सच्छिल चारित्र्यावर अशी चिखलफेक केल्याबद्दल नैतिक संतापानं कधी पेटतही नाहीत. त्यामुळे लोकांचा संशय बळावतो. साहेबांच्या

भारतासाठी । १०१