पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अशा अष्टपैलू शशीताईंची ओळख, त्यांचे विचार आपल्या ग्रामीण, आदिवासी महिला, त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावेत हीच ही पुस्तिका प्रकाशित करण्यामागची इच्छा आहे. शशीताईंनी आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी (एपिमास) संस्थेसोबत ज्या स्व-नियंत्रण मालिकांच्या १८ पुस्तिका तयार केल्या, त्यातील १६ पुस्तिकांचे आपण मराठीत भाषांतर करून घेऊन आपण त्या वापरतो.
 शशी राजगोपालन ह्या कोण होत्या? त्यांनी जीवनात काय केले? त्या कशा घडल्या? त्या कशा जगल्या? त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल ? या प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच, त्यांचा प्रेरणादायी जीवनपट आपल्यासमोर मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.
 ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून शशीताईंच्या संपर्कातील अनेक लोकांना भेटता आले, त्यांनी लिहिलेले लेख वाचता आले, त्यांच्याबद्दल लिहून घेता आले. ह्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती/संस्थाबद्दलची जवळीक आणखी वाढली. (त्यांचा नामनिर्देश स्वतंत्रपणे केला आहे).
 पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवावा, त्यांनी तो पुढे न्यावा हीच माफक अपेक्षा ठेवून या पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
 शशीताई अनेकांच्या नजरेतून पुढे आल्या, आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणखीनच वाढला. त्यांच्या जीवनात त्यांनी आपला ठसा अनेकांच्या आयुष्यावर प्रभावीपणे उमटवला ही गोष्ट त्यांच्या आंतरिक शक्तीची ग्वाही देते.

डॉ. सुधा कोठारी

❖❖❖

'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन ७